Loksabha2019 : महाडिक-शेट्टी की मंडलिक-माने उत्सुकता शिगेला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे चार दिवस असताना कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक विजयी होणार की सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातकणंगले मतदारसंघातही काटाजोड लढत असल्याने त्यात खासदार राजू शेट्टी ‘हॅट्‌ट्रिक’ करणार की सेना उमेदवार धैर्यशील माने आईंच्या पराभवाचा बदला घेणार? याचीही उत्सुकता आहे.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे चार दिवस असताना कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक विजयी होणार की सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातकणंगले मतदारसंघातही काटाजोड लढत असल्याने त्यात खासदार राजू शेट्टी ‘हॅट्‌ट्रिक’ करणार की सेना उमेदवार धैर्यशील माने आईंच्या पराभवाचा बदला घेणार? याचीही उत्सुकता आहे.

मतमोजणीचा दिवस जसा जवळ येईल, तशी कार्यकर्त्यांची मात्र घालमेल वाढू लागली आहे. गावात चौकाचौकांत आणि गल्लीबोळातील पारावर निवडणूक निकालाचीच चर्चा सुरू आहे. आपापल्या परीने कार्यकर्ते मतदानाच्या आकडेवारीवरून अंदाज बांधू लागले आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीचा दिवस उजाडेल, त्या वेळी ही उत्सुकता ताणली गेलेली असेल.

दवाखान्याचे बिल आपल्याकडेच सोशल मीडियावर चर्चा..
निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांना सावध करणाऱ्या एका संदेशाने धुमाकूळ घातला आहे. हा संदेश पुढीलप्रमाणे -
‘येत्या २३ मे रोजी घ्यायची काळजी -
१. सकाळी बीपीची गोळी आठवणीने घ्या व एक गोळी हातातच ठेवा.
२.    हलकाफुलका नाश्‍ता करावा, थंड पाणी जवळ ठेवा, मगच टीव्हीसमोर  बसा.
३.    मनात पक्कं करून ठेवा-
४.    कोनीबी आलं आणि कोनीबी पडलं, तर आपल्या दवाखान्याचं बिल आपल्यालाच द्यावे लागणार आहे...

खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर प्रा. मंडलिक यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यात काँग्रेसच्या एका गटाने प्रा. मंडलिक यांच्या मागे ताकद लावली आहे. दुसरीकडे युतीतील काहींनी उघडपणे प्रा. मंडलिक यांच्याविरोधात प्रचार करताना श्री. महाडिक यांना मदत केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत एका एका मतासाठी सुरू असलेली तडजोड, जेवणावळ्या, भेटवस्तूंचे वाटप आणि शेवटच्या दिवशी पैशाचे उघडपणे वाटप यांमुळे कोल्हापूरची निवडणूक चुरशीची बनली होती.

सुरवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूकही अंतिम टप्प्यात चुरशीची बनली. खासदार शेट्टी यांच्यासमोर नवख्या धैर्यशील माने यांनी चांगले आव्हान उभे केले आहे. जातीपातीच्या राजकारणाचा प्रभाव या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकरी नेता विरुद्ध तरुण अशा या लढतीकडेही जिल्ह्याचेच नव्हे; तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघात निकालाची प्रचंड उत्सुकता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Kolhapur Hatkanangale result Curiosity