Loksabha 2019 : घटक पक्षाकडे दुर्लक्ष पडणार महागात

शिवाजी यादव
बुधवार, 10 एप्रिल 2019

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक व महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार जोरात सुरू आहे. महाडिक यांचा व्यक्तिगत प्रचारावर, तर मंडलिक यांचा पक्षीय प्रचारावर भर आहे. असे असले तरी सोबतच्या घटक पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेण्यात दोन्ही उमेदवारांकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, याचा लाभ वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो, असा सूर रिपब्लिकन पक्षातून व्यक्त होत आहे.

आठ दिवसांपूर्वी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ तपोवन मैदानावर अलोट गर्दीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत युती व घटक पक्षांच्या नेत्यांनी सभेत बुलंद भाषणे केली. सभेला झालेल्या गर्दीने  उमेदवार संजय मंडलिक यांनाही बळ लाभले. त्यांचा प्रचार गावोगावी सुरू झाला; पण श्री. मंडलिकांसोबत सेनेचे काही पदाधिकारी नेते प्रचार आहेत, तर भाजप पदाधिकारी कार्यकर्तेही त्यांच्यासोबत आहेत; मात्र घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकनच्या आठवले गटाचे नेते, पदाधिकारी अजूनही प्रचारात तितक्‍या ताकदीने उतरल्याचे दिसत नाही.

राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचा प्रचार शांततेने व विकासाचे मुद्दे घेऊन जरूर सुरू आहे. यातही काँग्रेस-राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सावध भूमिका घेऊन प्रचारात आहेत; मात्र त्यांचे घटक पक्ष असलेले पीपल्स रिपब्लिकन किंवा रिपब्लिकनचा गवई गट अद्यापही सक्रिय झाल्याचे दिसत नाही.

या साऱ्याचा परिणाम असा, की जिल्हाभरातील आंबेडकरी विचारधारेतील कार्यकर्ते, तसेच त्यांचे कुटुंबीय त्यांच्या रिपब्लिकन पक्षांना जोडलेले आहेत. त्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात दिसत नाहीत. त्यामुळे रिपब्लिकनचा स्वतःचा जो मतदार आहे, त्यांच्यात संभ्रमावस्था वाढली आहे. अशातूनच पूर्वी काँग्रेसला मतदान करीत होतो. आता काँग्रेसला मतदान करू किंवा बहुजन वंचित आघाडीत सगळेच आपले आहेत, असे म्हणून तिकडे वळण्याच्या वाटेवर आहेत. हा संभ्रम वेळीच दूर झाला नाही तर कदाचित दोन्ही उमेदवारांना मतांचा फटका बसू शकतो. 

आम्ही सन्मान गुंडाळावा का?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आम्ही युतीमध्ये आहोत. प्रचार करण्याची आमची तयारी आहे; मात्र सन्मान गुंडाळून ठेवून कार्यकर्त्यांना वेठबिगारासारखे राबविणे चुकीचे होईल, त्यामुळे युतीच्या उमेदवारांनी आम्हाला जमेतच धरायचे नाही, असे ठरविल्यास उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.’’

Web Title: Loksabha 2019 Kolhapur Lok Sabha Constituency