Loksabha 2019 : पुतण्याच्या विजयासाठी आप्पांच्या जोडण्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पुतण्यासाठी स्वतःच्या बळाचा पट सक्रिय केला आहे. सभा, पदयात्रा यांपेक्षा वैयक्तिक गाठीभेटींवर त्यांचा भर आहे. पहाटे सहालाच त्यांच्या या जोडण्यांना सुरवात होते, दुपारची विश्रांती सोडली तर रात्री साडेदहापर्यंत श्री. महाडिक हे प्रचारात सक्रिय असतात.

महाडिक कुटुंबीयांचे प्रमुख अशी महादेवराव महाडिक यांची ओळख, घरातील कोणताही निर्णय असो त्यात त्यांचा ‘शब्द’ अंतिम. त्यामुळे कुटुंबात अतिशय आदराचे स्थान त्यांना आहे. निवडणूक मग ती स्वतःची असो किंवा घरातील कुणाची यांची स्वतंत्र मोर्चेबांधणीही ठरलेली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक त्यांचे पुतणे. पुतण्यासाठी स्वतः श्री. महाडिक रिंगणात उतरले आहेत. २५ वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहताना त्यांनी अनेकांना अनेक संस्थांवर किंवा इतर पदांवर मान दिला. आजही श्री. महाडिक कोणत्याही गावांत गेले तर लोकांचा गराडा त्यांच्याभोवती पडतो. ग्रामीण भागात त्यांची मोठी ‘क्रेझ’ आहे. पहाटेच त्यांचा दिनक्रम सुरू होतो. 

दुपारी दीडपर्यंत चार-पाच गावांतील प्रमुखांची भेट घ्यायची, नाराजांची भेट घेऊन आवश्‍यक ‘जोडण्या’ करायच्या आणि परत यायचे. दुपारी दोन तास विश्रांती आणि पुन्हा चारनंतर याच जोडण्यात रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून सुरूच असतात. चुकून काही वक्तव्ये जाऊ नये म्हणून अशा भेटीगाठीवरच त्यांनी आपला जोर ठेवला आहे. 

ड्रायव्हिंग मात्र स्वतःच 
श्री. महाडिक यांचे वय ७८ वर्षे आहे. या वयातही मोटार मात्र ते स्वतःच चालवतात. सकाळी किती वाजता कुठेही जायचे असू दे किंवा रात्री कितीही वेळ होऊ दे ड्रायव्हिंग मात्र ते स्वतःच करतात.

Web Title: Loksabha 2019 Mahadevrao Mahadik working for Dhananjay victory