Loksabha 2019 : मोदींनी आदिवासींच्या जमिनी विकल्या - मेधा पाटकर

Loksabha 2019 : मोदींनी आदिवासींच्या जमिनी विकल्या - मेधा पाटकर

सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे जाहीर सभेत केला. महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

पाटकर म्हणाल्या,‘‘देशातील सरकार जाती-जातीत विष पेरणारे, महिलांविरोधी, आदिवासी, दलितांना उद्‌ध्वस्त करणारे, देशात कंपनीराज आणू पाहणारे आहे. जमिनी, नदीचे पाणी विविध कंपन्यांच्या घशात घालत आहे. त्यामुळे मोदींना सत्तेवरून हटवणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. कारण निवडणुका संपताच गोरगरीब आदिवासी, दलितांच्या जमिनी मोदींच्या कळपातील कंपन्या ताब्यात घेतील. निसर्गाची नको तेवढी हानी  करून आपल्या देशाचे, भौगोलिक परिस्थितीचे शोषण करतील. या सौद्यांबरोबरच अदानीच्या कंपनीला आठ विमानतळही त्यांनी विकून टाकली आहेत. अशाप्रकारच्या देशविरोधी गोष्टी हे सरकार करीत आहे.’’

पाटकर म्हणाल्या, ‘‘ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांनी एक कंपनी आणली होती. मात्र नरेंद्र मोदी या देशात हजारो कंपन्या आणून कंपनीराज करू पाहताहेत. या देशात कंपन्या कर्जबाजारी झाल्या तर त्या वाचविल्या जातात; पण कष्टकरी, शेतकरी नेहमीच कर्जबाजारी राहतो, हे दुर्दैव आहे. देशातील एक टक्का लोकांकडेच देशाची ८० टक्के संपत्ती एकवटण्याचे हेच एकमेव कारण आहे. मूळ प्रश्‍नांवरून लक्ष विचलित  करण्यासाठीच भाजपकडून मंदिर-मज्जिद अशा  अनावश्‍यक मुद्द्यांवर चर्चा घडविली जात आहे. मोदींना या देशात हुकूमशाही आणयची आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आम्ही समविचारी सर्वजण आपापले पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. म्हणूनच स्वाभिमानीचे येथील उमेदवार विशाल पाटील आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू  शेट्टींनाच लोकसभेत पाठवा.’’

काँग्रेस आघाडीच्या राज्य प्रभारी सोनलबेन पटेल म्हणाल्या,‘‘मोदींनी गुजरात पॅटर्नचा गाजावाजा देशभर केला, तो निव्वळ फसवा होता.’’ स्वाभिमानीच्या पूजा मोरे म्हणाल्या,‘‘मुलींना पळवून नेण्याची भाषा करणारे, मुलींची थट्टा करणारे हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.’’

काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा रोटे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, पूजा पाटील यांची भाषणे झाली. 

कारखाने मोडीत काढणाऱ्यांना अद्दल घडवा...
पाटकर म्हणाल्या,‘‘प्रा. एन. डी. पाटील यांनी मोठ्या प्रयासाने तासगावचा कारखाना वाचविण्यासाठी आणि त्याची बेकायदा विक्री थांबविण्यासाठी लढा दिला; मात्र खासदार संजय पाटील यांनी तो मोडीत काढला. त्यांना अद्दल घडवा. 

आंबेडकरांचा अनाकलनीय निर्णय
पाटकर म्हणाल्या,‘‘प्रकाश आंबेडकरांचा एमआयएमशी समझोता अनाकलनीय आहे. यापूर्वीच्या आंदोलनात आम्ही त्यांच्याबरोबर होतो. जाती अंताच्या लढाईतही ते आमच्याबरोबर होते; मात्र निवडणुकीत एमआयएमशी समझोता त्यांनी का केला, असा प्रश्‍न माझ्यासारख्या चळवळतील कार्यकर्तीला पडला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com