Loksabha 2019 : महाडिकांच्या संपत्तीत पावणेपाच कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तब्बल चार कोटी ७४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्या कर्जात तब्बल चार कोटींची वाढ झाली आहे, तर त्यांच्या वैयक्तिक नावावर १ कोटी ९४ लाख रुपये किमतीची १७ वाहने आहेत.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तब्बल चार कोटी ७४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्या कर्जात तब्बल चार कोटींची वाढ झाली आहे, तर त्यांच्या वैयक्तिक नावावर १ कोटी ९४ लाख रुपये किमतीची १७ वाहने आहेत.

श्री. महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. अर्जासोबत भरलेल्या विवरण पत्रात ही माहिती आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रात त्यांची एकूण संपत्ती १५ कोटी ९७ लाख ३७ हजार रुपयांची होती, यावेळी ती २० कोटी ७२ लाख १० हजार झाली आहे. अरुंधती यांच्याही संपत्तीत २ कोटी ४ लाखांची वाढ झाली असून, २०१४ ला सौ. महाडिक यांच्याकडे २ कोटी ४ लाख ५० हजारांची संपत्ती होती, ती ४ कोटी १६ लाख ९८ हजार रुपये झाली आहे.

शेतजमिनीची किंमत वाढली
श्री. महाडिक यांच्या नावे २०१४ ला ४.९२ कोटींची शेतजमीन होती, यावेळी ती ६.९४ कोटी झाली आहे. सौ. महाडिक यांच्या नावे १.०६ कोटींची जमीन होती, ती आता १.१० कोटींची झाली आहे. मुलगा पृथ्वीराजच्या नावे ७१.७५ लाखांची जमीन आहे. दुसरा मुलगा विश्‍वराज याच्याकडे २०१४ ला ९८.५४ लाखांची, तर तिसरा मुलगा कृष्णराज याच्या नावे ६७.४७ लाखांची शेतजमीन होती. आता ती अनुक्रमे १.१३ कोटींची व ७७.८५ लाख रुपयांची झाली आहे.

७.२६ कोटींची बिगरशेती जमीन
श्री. महाडिक यांच्याकडे २०१४ मध्ये ८ कोटी ६ लाखांची बिगरशेती जमीन होती. आता ती ७.२६ कोटींची झाली आहे. त्यांच्या पत्नी सौ. अरुंधती यांच्या नावे गेल्यावेळी बिगरशेती जमीन नव्हती. आता ती ५.८४ कोटींची झाली आहे.

बंगल्याची किंमत ८.८३ कोटी 

श्री. महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील बंगल्याची सध्याची किंमत ८.८३ कोटी दाखवण्यात आली आहे. २००१ साली १४ हजार २८० स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट त्यांनी १४.७५ लाखाला खरेदी केला. त्यावर १३ हजार ९९० स्क्वेअर फुटांचे बांधकाम आहे. 

कर्जात पाच कोटींची वाढ
श्री. महाडिक यांच्या नावे २०१४ ला ५ कोटी ८३ लाखांचे कर्ज होते. २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या कर्जासह दायित्वाची रक्कम १०.३४ कोटी रुपयांची असल्याचे विवरण पत्रात म्हटले आहे. त्यात बॅंकांचे कर्ज ४.७७ कोटी, तर इतरांकडून घेतलेल्या ४.३९ कोटी रकमेचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी सौ. अरुंधती यांच्या नावावर २.९६ कोटी, मुलगा पृथ्वीराजच्या नावावर १.३१ लाख, विश्‍वराजच्या नावावर २.८४ लाखांचे कर्ज आहे.

 

Web Title: Loksabha 2019 MP Dhananjay Mahadik 4.75 cores hike in property