Loksabha 2019 : कोल्हापुरात अडीच लाख खुर्च्या तरी भाड्याने मिळतात का ?

Loksabha 2019 : कोल्हापुरात अडीच लाख खुर्च्या तरी भाड्याने मिळतात का ?

कोल्हापूर - "कोल्हापुरात अडीच लाख खुर्च्या तरी भाड्याने मिळतात का याचा अभ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करावा. जे मैदान अडीच लाख क्षमतेचे नाही तिथे एवढी माणसे गोळा करणे हे भाजपचे "कॅरॅक्‍टर' आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

युतीच्या कोल्हापुरातील प्रचाराच्या प्रारंभाला अडीच लाख लोक येतील, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वाक्‍याची खिल्ली प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी उडवली  आज जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना भेटण्यासाठी श्री. पाटील कोल्हापुरात आले होते. तत्पुर्वी त्यांनी खासदार धनंजय महाडीक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात मोठे आकडे सांगायचे, भपका निर्माण करायचा, धनशक्ती मोठ्या प्रमाणात असल्याने भरपूर पैसे खर्च करायचे. रंगरंगोटी करायची, आरास करायची आणि सामान्य माणसाचे डोळे दिपतील असे काम करायचे. गेल्या पाच वर्षात अशा इव्हेंटशिवाय भाजपने काही केले नाही. कोल्हापुरची सभाही एक इव्हेंटच होईल. कोल्हापुरचे नागरीक सुजाण, हुशार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानणारा कोल्हापुरचा मतदार अशा इव्हेंटला भूलणार नाही.' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आम्ही ज्यांना नाकारतो, त्यांना ते मांडीवर घेऊन बसत आहेत. ज्यावेळी स्वतःला मूल होत नाही त्यावेळी दत्तक घेण्याचे प्रकार होतात. पाच वर्षे सत्तेत राहूनही भाजपचा पाळणा हालत नाही त्यामुळे बाहेरचे लोक घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे जवळपास 30 ते 35 टक्के त्यांचे उमेदवार हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आहेत. पाच वर्षाच्या सत्तेत यांनी पक्ष वाढवलाचा नाही उलट आयाराम आणि गयाराम यांच्यासाठीच वेळ घालवला,

- आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

ते म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेल्यात मूळ भाजपचा कार्यकर्ता कोठेच नाही. त्यांच्या उमेदवारीच्या यादीवर नजर टाकली तर सगळे बाहेरचच उमेदवार आहेत. लोकांचा जनाधार ज्यांना नाही त्यांना आम्ही नाकारतो, त्यांना ते पक्षात घेऊन उमेदवारी देत आहेत. काय होणार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. लोक अशा सर्वांचा पराभव केल्याशिवाय रहाणार नाहीत याबद्दल माझ्या मनात शंका नाही.' 

कालच दोन्ही कॉंग्रेससह समविचारी पक्षांची आघाडी झाली. यापुर्वी सर्वांच्या बैठका झाल्या आहेत. कोल्हापुरातील ही बैठक घेण्यासाठी आपण आलो आहोत. येणाऱ्या काळात प्रचाराची दिशा कशी असेल आणि आघाडीचा उमेदवार कसा विजयी होईल याची चर्चा आज करणार आहोत. दोन्ही कॉंग्रेस एकसंघपणे लढल्यास आमचा कोल्हापुरातील उमेदवार अडीच लाख मतांनी विजयी होईल, असा विश्‍वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com