Loksabha 2019 : बॉयलर पेटलाय; धूर निघणार!

Loksabha 2019 : बॉयलर पेटलाय; धूर निघणार!

सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा सामना अधिक रंगतदार होईल आणि त्यात गोपीचंद तडका असल्याने मुद्दे आणि गुद्दे सारेच पाहायला मिळेल. 

साखर कारखाना
वसंतदादा साखर कारखान्यासमोरील संकट हे काँग्रेस, विशाल पाटील आणि वसंतदादा घराण्यावर हल्लाबोल करण्याचे पहिले शस्त्र भाजपच्या हाती असेल. विशाल यांनी मोठ्या प्रयत्नाने कारखाना भाड्याने देऊन वाचवला असला तरी तो अडचणीत येण्याच्या मुळांवर भाजप नक्कीच घाव घालणार. खासदार संजय पाटील यांच्या मानगुटीवर पुन्हा एकदा तासगाव साखर कारखान्याचे भूत बसेल, अशी शक्‍यता वर्तवली जातेय. ‘वसंतदादा’वरून ते हल्ला करू लागले तर विशाल तासगावचा बाण चालवू शकतील. त्यात भर म्हणजे,  यशवंत कारखान्याचा न्यायालयीन आणि राजकीय वाद. त्यात विशाल पाटील हे अनिल बाबर यांचीही अडचण करू शकतात.

उपसा सिंचन योजना
खासदार संजय पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या विस्तारीकरणाला गती दिली. सुधारित प्रस्तावांना मंजुरी घेऊन काही कामेही मार्गी लावली.  भाजप तो डंका पिटेल. या योजनांची पायाभरणी वसंतदादा पाटील यांनीच केली असल्याचा मुद्दा विशाल पाटील रेटतील. जत तालुक्‍यातील ४२ गावांचा पाणी प्रश्‍न तापेल. पाणीपट्टी आकारणीचा आघाडी व युती काळातील फरक, हाही मुद्दा चर्चेत 
आणला जाईल. 

राजू शेट्टींची भूमिका
खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेवरून भाजपने त्यांना घेरलेले आहे. एकीकडे ऊस आंदोलन, दुसरीकडे साखर कारखानदाराला उमेदवारी, त्यात वसंतदादा कारखान्याची थकीत देणी यावरून हल्लाबोल होऊ शकतो. शेट्टींनी स्वार्थी भूमिका घेत स्वतःचा मतदार संघ तेवढा पाहिला, रविकांत तुपकरांवर अन्याय केला, असा आरोप भाजपकडून सतत केला जाऊ शकतो. 

भाजपमधील धुसफूस
खासदार संजय पाटील आणि भाजपचे आमदार व अन्य नेत्यांत  गेल्या पाच वर्षांत बरीच ताणाताणी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी या जखमांवर मलमपट्टी केली असली तरी काँग्रेसकडून त्याच्या खपल्या काढण्याची संधी साधली जाईल, अशी चर्चा आहे. विशेषतः अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख आणि सुरेश खाडे यांच्या कार्यकर्त्यांना ‘टार्गेट’ केले जाऊ शकते. 

आरक्षणाचा मुद्दा
धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर मैदानात असतील, असे चित्र आहे. ते खासदार पाटील आणि विशाल या दोघांवर सडकून हल्ला करतील. त्यात धनगर, मराठा आरक्षणासह सामाजिक प्रश्‍नांवर ते रान उठवतील. त्यांनी माघार घेतली तरी ते आपल्या सभांनी मैदानात गाजवणार हे मात्र नक्की. 

गल्ली ते दिल्ली
या प्रचारात राष्ट्रीय मुद्दे नक्कीच चर्चेला येतील. त्यात काँग्रेसने साठ वर्षात काय केले? दीर्घकाळ घरात खासदारकी असताना वसंतदादांच्या वारसांना विकास का केला नाही, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारच्या धोरणावर आसूड ओढण्याची तयारी राजू शेट्टींनी केलेली आहेच. त्यामुळे स्थानिक मुद्यांसह देशाची सुरक्षा, बेरोजगारीसारखे राष्ट्रीय प्रश्‍नही 
चर्चेत असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com