Sangli Loksabha 2019 : वाढला टक्का; कुणाला धक्का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

एक नजर

  • सांगली लोकसभा मतदारसंघात चुरशीने मतदान
  • सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान
  • एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४. 
  • २०१४ ला ६३.६८ टक्के मतदान 

सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे. 

२०१४ ला ६३.६८ टक्के मतदान झाले होते. त्यात यावर्षी मतदारांची संख्या वाढूनही मताचा टक्का वाढला आहे. वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार, कुणाची विकेट जाणार आणि कोण दिल्लीचे विमान पकडणार, हे आज यंत्रात बंदिस्त झाले. २३ मे रोजी निकाल लागेल. तोवर अंदाजांचे फुगे सांगलीच्या अवकाशात उडत राहतील. 

सांगली लोकसभा मतदार संघ आठ तालुक्‍यांचा आणि सहा विधानसभा मतदारसंघांचा. पैकी सहा तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थिती असताना मतदारांनी दाखवलेला उत्साह लक्षवेधी ठरला. थेट तिरंगी लढतीमुळे कार्यकर्त्यांच्या फौजा मैदानात उतरलेल्या दिसल्या. सांगली, मिरज, विटा, तासगाव या प्रमुख शहरांसह तालुका ठिकाण आणि मोठ्या गावांत प्रचंड चुरस निर्माण झालेली दिसली. छोटी गावे आणि वाड्या वस्त्यांवरही तिरंगी लढतीचेच चित्र राहिले. प्रचंड उन्हात मतदारांनी रांगा लावून मतदान केले. 

दिव्यांगासाठी खास सोय, लहान मुलांसाठी पाळणाघर, मतदान केंद्रांवर पाण्याची सोय, गुलाबी मतदान केंद्र अशा काही वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नांनी लक्ष वेधून घेतले. यंदा मताचा टक्का ठरवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आणि त्यात यशही आले. त्यामुळे प्रशासन खूष असले तरी हा वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार, याकडे लक्ष असेल. 

निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने जनजागृती केली. दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. मतदारांनीही यासाठी प्रतिसाद मिळाल्याचे आज झालेल्या मतदानावरून स्पष्ट होते. स्वयंसेवी संस्थांचेही प्रशासनाला चांगले सहकार्य मिळाले. 
- डॉ. अभिजित चौधरी,
जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

तृतीयपंथीयांचे मतदान
निवडणूक आयोगाकडे पहिल्यांदाच ‘ते’ म्हणून स्वतंत्र नोंद झालेल्या तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यातही उत्साह जाणवत होता.

‘बूथ’ पद्धतीला फाटा
मतदाराचा फोटो, प्रभाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, पत्ता, खोली क्रमांक असलेल्या स्लिपा घरोघरी पोहोच करण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या १९५० क्रमांकावर मतदान केंद्राची मोठ्या प्रमाणावर चौकशी झाली. त्यामुळे बूथवर गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्याची वेळ या निवडणुकीत आली नाही. ग्रामीण भागात पूर्णपणे बूथ पद्धती काही प्रमाणात पहायला मिळाली. 

किती वाजता किती टक्के 
* सकाळी ९ वा. ः ७ टक्के
* सकाळी ११ वा. ः २० टक्के
* दुपारी १ वा. ः ३४ टक्के
* दुपारी ३ वा. ः ४६.८४ टक्के
* सायंकाळी ५ वा. ः ५९.५ टक्के

मतदानासाठी प्रचंड प्रतिसाद होता. राष्ट्रीय कर्तव्य मानून लोकांनी मतदान केले. चांगल्या वाईटाची पारख करून लोकांनी आपला खासदार निवडला आहे. मी दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी होईन.
- खासदार संजय पाटील,

भाजपचे उमेदवार

सांगली मतदार संघातील जनतेने वसंतदादांचा विचार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्याची पोचपावती मतदान यंत्रात कैद केली आहे. मी दीड लाख मतांनी विजयी होईन, याची खात्री आहे.
- विशाल पाटील,

स्वाभिमानीचे उमेदवार

मी निवडणुकीला उभा राहिलो त्याच वेळी निकाल ठरला होता. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लोकांनी मतदान केले आहे. सर्व पक्षांतील लोकांनी माझ्यासाठी काम केले आहे. दोन लाख मतांनी माझा विजय होईल.
- गोपीचंद पडळकर,

वंचितचे उमेदवार

Web Title: Loksabha 2019 Sangli voting 65 percent