Loksabha 2019 : शेतकऱ्यांना साले - लावारीस  म्हणणाऱ्यांना शरम वाटत नाही का? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

देशात अक्षरधाम मंदिर, रघुनाथ मंदिर, लोकशाहीचे मंदिर, अमरनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ले झाले. ते सारे भाजपच्या काळात. यांना मंदिरे सांभाळता येत नाहीत ते देश काय सांभाळणार? पठाणकोठ आणि पुलवामा हल्ले हे त्यांच्या अक्षम्य ढिलाईची स्मारके आहेत. यांच्या हाती देश सुरक्षित नाही

तासगाव - शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्याच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे भाजपवर केली.

नेहमी टोकाची टिका टाळणाऱ्या पवार यांनी आज मात्र भाजपवर कठोर शब्दाचे आसूड ओढले. सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भर उन्हात ही सभा झाली. 

श्री पवार म्हणाले,"" भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांचा उल्लेख साले असा करतात तर त्यांचे वाघ नामक प्रवक्ते शेतकऱ्यांच्या पोरांचा लावारीस असा उल्लेख करतात. सत्तेच्या माजाची ही लक्षणे आहेत. या निवडणुकीत तो माज उतरवा. यांनी पाच वर्षात सांगितलेले काय केले हे दाखवा. 'न खाऊंगा न खाने दुंगा' असे म्हणणाऱ्या मोंदीच्या काळात राफेल विमानांची किंमत साडेसहाशे कोटींवरून सोळाशे साठ कोटींवर गेली. शाळेत कागदी विमान बनवण्याच्या अनुभव असलेल्या अनिल अंबानीला त्यांनी राफेलच्या देखभाल दुरुस्तीचा चाळीस हजार कोटींचा ठेका दिला. त्यासाठी त्यांची सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यापर्यंत यांची मजल गेली. या देशात अक्षरधाम मंदिर, रघुनाथ मंदिर, लोकशाहीचे मंदिर, अमरनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ले झाले. ते सारे भाजपच्या काळात. यांना मंदिरे सांभाळता येत नाहीत ते देश काय सांभाळणार? पठाणकोठ आणि पुलवामा हल्ले हे त्यांच्या अक्षम्य ढिलाईची स्मारके आहेत. यांच्या हाती देश सुरक्षित नाही.'' 

यावेळी आमदार विश्‍वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, खआसदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Loksabha 2019 Sharad Pawar comment