Loksabha 2019 : ‘डॅमेज कंट्रोल’पेक्षा शरद पवार यांचा जोडण्यांवर भर

Loksabha 2019 : ‘डॅमेज कंट्रोल’पेक्षा शरद पवार यांचा जोडण्यांवर भर

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘डॅमेज कंट्रोल’पेक्षा जिल्ह्यातील विविध पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन जोडण्या लावण्यावरच भर दिला. दिवसभराच्या चर्चेत किंवा मेळाव्यात ते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविषयी काही भाष्य करतील, असे वाटत होते. परंतु, त्यांनी हा मुद्दाच बेदखल केला.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांसमवेत हॉटेलमध्ये बंद खोलीत झालेल्या चर्चेत मात्र त्यांनी श्री. पाटील यांच्या भूमिकेची माहिती जाणून घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी श्री. पवार कोल्हापुरात होते. श्री. पवार यांच्या उपस्थितीत रामकृष्ण हॉलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत झाला.

या दौऱ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती आमदार सतेज पाटील यांचीच. श्री. पाटील हे पवार यांना भेटणार का? मेळाव्याला येणार का? याविषयी उत्सुकता होती. परंतु, श्री. पाटील यांनीच याकडे पाठ फिरवली. श्री. पवार यांनी संपूर्ण दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, उमेदवार महाडिक यांच्याशी बंद खोलीत केलेल्या चर्चेव्यतिरिक्त संपूर्ण दौऱ्यात हा मुद्दाच बेदखल केला. या नेत्यांनीही श्री. पाटील यांची भूमिका बदलणार नसल्याचे श्री. पवार यांना सांगितल्याचे समजते. 

पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी श्री. महाडिक यांना निवडून देण्याचे आवाहन केले; पण या मेळाव्याला राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या काही नगरसेवक व पदाधिकारी यांनीच पाठ फिरवली. त्याचीही चर्चा दौऱ्यात झाली.

या दौऱ्यात ‘डॅमेज कंट्रोल’पेक्षा पक्षासोबत आहेत, पण प्रचारात नाहीत, अशांशी चर्चा करून त्यांच्या जोडण्या लावण्यावरच श्री. पवार यांनी भर दिला. त्यात जनता दलाचे ॲड. श्रीपतराव शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी श्री. पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर भुदरगडचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्याशीही श्री. पवार यांनी फोनवरून संपर्क साधत उद्या (ता. ३) भेटीचे निमंत्रण दिले. 

मेळाव्यानंतर हॉटेलवर काँग्रेससह राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांशी त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी मतदारसंघाचा तालुकानिहाय आढावा घेतला. गगनबावडा, कोल्हापूर दक्षिण, उत्तरमध्ये काय होईल, याची माहिती त्यांनी या नेत्यांकडून घेतली. 

व्ही. बीं.च्या घरी भोजन
रात्री श्री. पवार यांच्यासह मेळाव्याला उपस्थित दोन्हीही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी सहभोजन केले. रात्री पावणेनऊच्या सुमारास श्री. पवार हे श्री. पाटील यांच्या घरी आले. सुमारे पाऊण तास ते याठिकाणी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com