Loksabha 2019 : शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (ता. १७) सायंकाळी ५ वाजता गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून खा. पवारांनी आतापर्यंत जिल्ह्यात पाच ते सहा वेळा भेट देत, कोल्हापूरच्या जागेचे महत्त्व अधोरेखित केले आहे

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (ता. १७) सायंकाळी ५ वाजता गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून खा. पवारांनी आतापर्यंत जिल्ह्यात पाच ते सहा वेळा भेट देत, कोल्हापूरच्या जागेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पवार यांनी कोल्हापूरसाठी एवढा वेळ खर्च केला आहे. 

खासदार पवार यांनी कोल्हापूरची जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. कोल्हापुरातील बारीकसारीक घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत. गांधी मैदानातील सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किती लोकं आणायची, याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच आघाडीतील जे नगरसेवक, पदाधिकारी सक्रिय नाहीत, त्यांनाही या सभेस येण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सभेच्या वातावरण निर्मितीसाठी शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येत आहेत. 

सभेला किमान ७५ हजार लोक उपस्थित राहतील, यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी, सकाळी फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत येथे पदयात्रा काढली जाणार आहे. यासाठी काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील,  राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत. गांधी मैदानातील सभेसाठी काँग्रेसकडून कोण येणार, हे मात्र निश्‍चित झालेले नाही. 

काँग्रेसच्या नेत्यांची पाठ
लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. आठवड्यावर मतदानाची तारीख आली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसच्या एकाही ज्येष्ठ नेत्याने जिल्हा दौरा केलेला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी मंडळी येणार असल्याचे कधी राष्ट्रवादीचे, तर कधी काँग्रेसचे नेते सांगतात. मात्र, आजपर्यंत कोणीही दौऱ्यावर आलेले नाही. आता सहायक प्रभागी सोनल सिंग येणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून न राहता राष्ट्रवादीने आपल्या पद्धतीने सभेचे नियोजन केले आहे. 

राष्ट्रवादीचे नेते घेणार प्रचारसभा
खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची शनिवारी (ता. २०) गारगोटीत सभा होणार आहे; तर खासदार उदयनराजे भोसले हे शुक्रवारी (ता. १९) सकाळी रोड शो करणार आहेत. शिये येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील सभा घेणार आहेत. आठवड्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Web Title: Loksabha 2019 Sharad Pawar on Kolhapur Tour