Loksabha 2019 : तुम्ही ठरवलंय; मग मी बी ध्यानात ठेवलंय : पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

निशाणा साधला...
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. श्री. पवार यांनी आतापर्यंत चारवेळा कोल्हापूर दौरा केला. प्रत्येक दौऱ्यात श्री. पवार आणि श्री. पाटील यांची भेट होईल, अशी उत्सुकता जिल्ह्याला होती; मात्र ही भेट झाली नाही. या दौऱ्यावेळी पवार यांनी पाटील यांना बेदखल केले. त्यांनी कधीही श्री. पाटील यांचा विषय काढला नाही; मात्र आज पेठवडगाव येथे श्री. पवार यांनी श्री. पाटील यांच्याबाबतचे मौन सोडून त्यांच्यावर निशाणा साधला.

कोल्हापूर - कोल्हापुरात कोणी तरी ‘आम्ही ठरवलंय’ असं काही तरी ऐकायला मिळालंय. याबाबत चौकशी केली असता आमच्याच कोणी तरी भाऊबंदाने हे केले आहे. तुम्ही जर ठरवलंय, तर मग मी बी ध्यानात ठेवलंय, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता दिला. खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ पेठवडगाव येथे आज आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक यांच्यामध्ये चुरस आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेचे मंडलिक यांचा प्रचार सुरू केला आहे. ‘आमचं ठरलंय’, अशी टॅगलाईन चालवली आहे. आमदार पाटील यांचा शुक्रवारी (ता. १२) वाढदिवस होता. यानिमित्त सोशल मीडियासह सर्वत्र ‘आमचं ठरलंय’ अशी जाहिरातबाजी करण्यात आली. याचा संदर्भ घेत श्री. पवार यांनी सतेज पाटील यांचा समाचार घेतला.

श्री. पवार म्हणाले, ‘‘वर्तमानपत्रात सर्वत्र ‘आम्ही ठरवलंय’ असं माझ्या वाचनात आलं. याबाबत चौकशी केली असता आमच्याच एका भाऊबंधाने काही तरी ठरवलं असल्याचं समजलं. ठीक आहे; तू ठरवलं तर ठरवलं, मग मी बी ध्यानात ठेवलंय. माझं सांगणं एक आहे, तुमच्या लहान, छोट्या छोट्या गोष्टींपेक्षा देशाच्या हिताची जपणूक करण्याचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त करणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला खेचण्याचा प्रश्‍न ज्यावेळी येतो, तेव्हा तुम्ही असल्या भानगडी करता?’’

ते म्हणाले, ‘‘कृष्णा, पंचगंगेचं पाणी प्यायलेला जो असेल आणि या जिल्ह्यातील मातीतील ज्यांनी अन्न खाल्लेलं असेल तो अशा प्रकारच्या संकुचित वृत्तीला कधीही जाणार नाही. देशाच्या हितासाठी जे करावं लागेल, ते करण्यासाठी या जिल्ह्यातील प्रत्येक घटक प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही.’’

निशाणा साधला...
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. श्री. पवार यांनी आतापर्यंत चारवेळा कोल्हापूर दौरा केला. प्रत्येक दौऱ्यात श्री. पवार आणि श्री. पाटील यांची भेट होईल, अशी उत्सुकता जिल्ह्याला होती; मात्र ही भेट झाली नाही. या दौऱ्यावेळी पवार यांनी पाटील यांना बेदखल केले. त्यांनी कधीही श्री. पाटील यांचा विषय काढला नाही; मात्र आज पेठवडगाव येथे श्री. पवार यांनी श्री. पाटील यांच्याबाबतचे मौन सोडून त्यांच्यावर निशाणा साधला.

Web Title: Loksabha 2019 Sharad Pawar targets Narendra Modi in Kolhapur rally