Loksabha 2019 : युतीच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

Loksabha 2019 : युतीच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर उद्याची सभा होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी चारला उजळाईवाडी विमानतळ येथे आगमन होईल. तेथून ते अंबाबाईच्या दर्शनासाठी जातील. हॉटेल सयाजी येथे काही काळ राखीव असेल. सायंकाळी तपोवन मैदानाच्या दिशेने रवाना होतील. सभेनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम होईल. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे त्यांच्याबरोबर असतील. चहापानानंतर मुख्यमंत्री बेळगावच्या दिशेने रवाना होतील.

उद्धव ठाकरे यांचे दुपारी तीनला उजळाईवाडी विमानतळ येथे आगमन होईल. हॉटेल सयाजी येथे काही काळ राखीव असेल. सायंकाळी अंबाबाईच्या दर्शनानंतर ते थेट सभास्थळी जातील. सभेनंतर पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह ठाकरे भेट देतील.

तेथून ठाकरे बेळगावच्या दिशेने रवाना होतील. कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभेस हजेरी लावणार आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते, उपनेत्या नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज सायंकाळी सभास्थळाची पाहणी केली. युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी जयलक्ष्मी सभागृहात सभेचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास सभास्थळाची पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे फ्लेक्‍स झळकले आहेत. लाल रंगाचे कारपेट अंथरले गेले आहे. ध्वनियंत्रणा, व्यासपीठावरील बैठकव्यवस्थेची रावते यांनी पाहणी केली. 

सेनेची मोटारसायकल रॅली
आमदार क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांसह दुपारी मैदानाची पाहणी केली. पाच हजार शिवसैनिक मोटारसायकल रॅलीने सभास्थळी जाणार आहेत. मैदानावर भव्य व्यासपीठाची उभारणी झाली असून, कोणत्याही कोपऱ्यातून भाषणे कानी पडतील, अशी ध्वनियंत्रणेची व्यवस्था केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com