Loksabha 2019 : सांगली जिल्ह्यात ईव्हीएम बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेत अडथळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

एक नजर

  • सांगली जिल्ह्यात लोकसभेसाठी आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरु होताच अनेक ठिकाणांहून ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी
  • वाळवा तालुक्यातील ताखराळे येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मतदान
  • चिंचणीत खासदार संजय पाटील यांनी केले मतदान

सांगली - जिल्ह्यात लोकसभेसाठी आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरु होताच अनेक ठिकाणांहून ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींची रीघ सुरु झाली. सकाळी-सकाळीच बिघाडाच्या तक्रारीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

आटपाडी येथे प्रभाग क्रमांक पाचमध्ये ईव्हीएम मशीन सुरूच झाले नाही. एक तास मतदान बंद राहीले. सकाळी आठ वाजता तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दुसरे मशीन पुरवले आणि मतदान सुरू केले. प्रभाग क्रमांक पाच मधील मतदार एसटीबस चालक तानाजी गायकवाड मतदानासाठी आले असता मशीन बंद पडल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. ते मतदान न करताच बसवरील ड्युटीला गेले.

मिरज शहरातील दोन मतदान केंद्रांवर यंत्रामध्ये बिघाड झाला, त्यापैकी एका मतदान केंद्रावर अद्याप मतदान सुरु नाही.
जत येथे शिवाजी पेठेत बूथ क्रमांक 125 मध्ये मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदार मतदानाच्या प्रतिक्षेत थांबले. काहीजण मतदान न करताच परतले.

सांगलीत उर्दू शाळा क्रमांक 17 येथेही मतदान यंत्रामुळे सकाळी तासभर गोंधळ आणि वादावादी सुरु होती. कांचनपूर ( ता. मिरज ) येथे भाग 32 वर  मतदान यंत्र बंद पडल्याने एक तास 10 मिनिटे उशिरा मतदान सुरू झाले. 

शेटफळ ( ता. आटपाडी ) येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आधारकार्डवर मतदान करण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले. मतदानासाठी विविध अकरा शासनमान्य ओळखपत्रांत आधार कार्डचा समावेश आहे, तरीही अधिकाऱ्यांनी ही अनाकलनीय भूमिका घेतली. 

जयंत पाटील यांनी केले मतदान

वाळवा तालुक्यातील ताखराळे येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कुटूंबासमवेत मतदान केले.

चिंचणीत खासदार संजय पाटील यांचे मतदान

चिंचणी ( ता. तासगाव ) येथे  सकाळी सात वाजता मतदान सुरु होताच मतदान यंत्रात बिघाड झाल्याने ते बंद पडले. ईव्हीएम मशिन बदलल्यानंतर काही वेळातच मतदान सुरळीत सुरू झाले. खासदार संजय पाटील यांनी याच केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

सांगलीत त्रिकोणी बागेजवळ केंद्र क्रमांक 207 वर कोणतेही बटण दाबले तरी मत एका ठराविक चिन्हाकडे जात असल्याचा संशय लोकांनी व्यक्त केला. त्यामुळे गोंधळ झाला. तशी तक्रार झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तातडीने तेथे दाखल झाले.

गुजराती हायस्कूलमध्येही मतदान यंत्रात बिघाड 
शेटफळे ( ता. आटपाडी ) येथे प्रभाग क्रमांक पाचमध्ये सुरू केलेले ईव्हीएम मशीन सात मतदानानंतर बंद पडले. सांगलीत मतदान केंद्र 207 वर पावणे दोन तास मशिन बंद राहीले. 
शेखर इनामदार, उदय पवार यांनी मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्याची मागणी केली.

 

 

Web Title: Loksabha 2019 Violation of polling in Sangli district due to EVM disruption