Loksabha 2019 : सोलापुरात नऊ रुपये संपत्ती असलेले महास्वामी रिंगणात 

Mahaswami
Mahaswami

सोलापूर : केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवासी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी 45 हजार रुपयांचे कर्ज हातउसने घेतले आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामी व महाराजांच्या उमेदवारीमुळे भलताच चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उमेदवारी दाखल केली. त्याच वेळी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दाखल केले असून, फक्त नऊ रुपये हाती असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे. व्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे. 

कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. 31 वर्षीय व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी मिळवली आहे. निवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एकीकडे कोट्यधीश महाराज निवडणूक रिंगणात असताना केवळ नऊ रुपये हाती आणि 45 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरून राहतात,, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 

डॉ. जयसिद्धेश्‍वरांकडे 6.46 कोटींची मालमत्ता 
भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर यांच्याकडे सहा कोटी 46 लाख 079 रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. 10 हजार रुपये किमतीची ऍम्बेसिडर, दोन लाख रुपये किमतीची पूजेला लागणारी चांदीची भांडी यासह इतर मालमत्ता असल्याचा उल्लेख आहे. स्थावर व जंगम मालमत्ता मिळून त्यांच्याकडे 6.46 कोटींची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com