Loksabha 2019 : उन्हामुळे नेते, कार्यकर्त्यांचा निघतोय ‘घाम’!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

जिल्ह्याच्या पूर्व भागात उष्णता अधिक
पश्‍चिम भागापेक्षा जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण-खटाव तालुक्‍यात सध्या पदयात्रा सकाळी दहापर्यंत अन्‌ गावांना भेटी, सभा दुपारनंतरच घेतल्या जात आहेत. सभा सायंकाळी असल्या तरी वातावरणात उकाडा असल्याने श्रोते, कार्यकर्ते घामाघूम होत आहेत.

सातारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले असतानाच उन्हाचा पाराही चाळिशी गाठू लागला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या तापमानामुळे कार्यकर्त्यांचा पदयात्रा, सभांदरम्यान ‘घाम’ निघू लागला आहे. थंड पाणी आणि सावलीचा आश्रय घेत कार्यकर्ते अन्‌ नेते कुच करत आहेत.

गेल्या तीन आठवड्यांत दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतो आहे. सकाळी नऊ वाजले की उन्हाची तीव्रता जाणवू लागते. ११ वाजल्यापासून तर घराच्या बाहेर पडणेही नागरिकांना नकोसे होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या तुलनेते पश्‍चिम भागात उन किंचित कमी वाटत असले तरी आता पारा 
चाळिशीपर्यंत पोचत असल्यामुळे सकाळी ११ नंतर नागरिकांना थंडाव्याचा आसरा घ्यावा लागत आहे. माण-खटाव, कोरेगाव तसेच फलटण तालुक्‍यांत तर शिवारातील कामे सकाळी दहाच्या आत उरकण्यावर शेतकरी मंडळींचा भर असतो. दुपारपासून सायंकाळी चार ते पाचपर्यंत शिवारात माणसे जाणेही टाळू लागली आहेत. अशा कडकडीत उन्हात प्रचार मात्र सुरू आहे. उन्हाचा त्रास जास्तीत जास्त टाळण्यासाठी आजही मोठ्या जिल्ह्यातील मोठ्या गावांत आणि शहरात नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सकाळी दहापर्यंतच पदयात्रा उत्साहाने काढत आहेत. 

याच कालावधीत आणि सायंकाळी गावागावांना उमेदवार भेटी देण्यावर नेत्यांनी भर दिला आहे. छोट्या छोट्या सभांना श्रोते लाभावेत यासाठी सायंकाळी पाचनंतर सभा घेतल्या जात आहेत. त्या रात्री दहापर्यंत सुरू राहत आहेत. 

मतदारसंघ मोठा असल्याने गावागावांत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांना भर उन्हात एका गावाहून त्या गावाला जावे लागत आहे. सभेच्या ठिकाणी किंवा रॅली दरम्यान कार्यकर्ते आधी थंड पाणी शोधताना आढळतात. तसेच प्रचाराला बाहेर पडताना नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या गाड्यांतून हमखास पाण्याच्या बाटल्यांचा ‘स्टॉक’ घेतला जात आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Activists Summer Temperature