Loksabha 2019 : काँग्रेसने गरिबी हटवली नाही - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

पाण्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
‘मुळशी येथील टाटांच्या धरणाचे पाणी पूर्वेकडून इंदापूर तालुक्‍यात वळविले असते; तर इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांचा बारमाही पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला असता. राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये आमदार राहुल कुल यांचा समावेश आहे. त्यामुळे २२ गावांसह इतर पाण्याचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली.

येथील रेल्वे मैदानावर भाजप-शिवसेना महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘काँग्रेसने ५५ वर्षे तीच ती पूर्ण न करणारी आश्‍वासने दिली; परंतु गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक उपयोगी योजना अमलात आणल्या. लातूर येथे आमच्या सरकारने फक्त ६० दिवसांत रेल्वेचे कोच बनवण्याचा कारखाना उभा करण्यास मंजुरी देऊन भूमिपूजनही केले. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर रेल्वेमंत्री प्रत्यक्ष येथे येऊन येथील रेल्वे कारखान्याचा प्रश्‍न सोडवतील.

आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला की काँग्रेस आघाडीचे सरकार पाकिस्तानचा निषेध करत फक्त चर्चा करत होती. मोदी सरकारच्या काळात सर्जिकल, एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांना मारून त्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केले. भाजप सरकार पुन्हा येणार व आम्ही कृष्णा-भीमा स्थिरीकरण निश्‍चित करणार.’’ रामदास आठवले म्हणाले, की कुर्डुवाडी येथील रेल्वे वर्कशॉप बंद होऊ देणार नाही.

Web Title: Loksabha Election 2019 Congress Poor Devendra Fadnavis Politics