Loksabha 2019 : मतदान केंद्रांवर औषधोपचाराचीही सुविधा

हेमंत पवार
बुधवार, 17 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या मतदान केंद्रांवर लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदानासाठी आलेल्या रुग्णांना आवश्‍यकता भासली तर किंवा अचानक कोणाला त्रास सुरू झाला तर त्यांच्यासाठी दहा प्रकारची औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. संबंधित मतदान केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि अन्य कर्मचाऱ्यांव्दारे ही यंत्रणा राबवली जाणार असून त्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.’’ 
- डॉ. सुनील कोरबू, आरोग्य अधिकारी, कऱ्हाड

कऱ्हाड - मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता मतदान केंद्रांवर येणाऱ्या रुग्णांना जर अचानक आवश्‍यकता भासली तर तेथे दहा प्रकारची औषधेही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या वाढलेला उन्हाचा तडाखा विचारात घेऊन ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या असून, मतदानादिवशी संबंधित मतदान केंद्रांवर औषधे उपलब्ध केली जाणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून २३ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम जिल्हा व तालुका पातळीवर राबवले जात आहेत. त्याअंतर्गत चित्रकला, रांगोळी, वत्कृत्व स्पर्धा, पथनाट्य याव्दारेही मतदारांत जनजागृती करण्यात येत आहे. त्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठीचीही कार्यवाही निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. जे मतदार आजारी आहेत आणि त्यांना निवडणुकीच्या मतदानादरम्यान जर काही त्रास सुरू झाला तर त्यांना मतदान केंद्रावरच दहा प्रकारची औषधेही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे त्यांना प्राथमिक उपचार देण्याची सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, पोटदुखी, पित्त, अशक्तपणा यावरील औषधांसह एखाद्यावेळी जखम झाल्यास त्यावर लावण्यासाठी मलमाचीही व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे.

त्यासाठी आरोग्य विभागाला संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आता मतदान केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अन्य कर्मचाऱ्यांव्दारे ही यंत्रणा राबवली जाणार आहे. सध्या वाढलेला उन्हाचा तडाखाही विचारात घेऊन ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू असून मतदानादिवशी दिवसभर मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Voting Center Medicine Facility