Loksabha 2019 : कोल्हापूर, हातकणंगलेचा कौल कुणाला?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता आहे. गेल्या दोन निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तेच्या विरोधात जनतेने कौल दिल्याचा इतिहास आहे. 

कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता आहे. गेल्या दोन निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तेच्या विरोधात जनतेने कौल दिल्याचा इतिहास आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४१ जागा भाजप-सेना युतीने जिंकल्या होत्या. त्यावेळी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी भाजपसोबत होते. त्यांच्या रूपाने आणखी एक जागा भाजपला मिळाली. राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेसला केवळ चारच जागा जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेनेच्या राज्यातील जागा घटतील, असा अंदाज बहुतांश ‘एक्‍झिट पोल’ नी व्यक्त केला आहे. यावेळी दोन्ही काँग्रेसला मिळून १६ जागा मिळण्याची शक्‍यता आहे. त्यात राष्ट्रवादीच्या जागा वाढतील, असेही एक्‍झिट पोलमधून दिसते. त्यामुळे राष्ट्रवादी कोणत्या मतदारसंघात विजयी होणार, याविषयी उत्सुकता असेल. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत आहे. काँग्रेसच्या एका मोठ्या गटाने प्रा. मंडलिक यांच्या मागे लावलेली रसद आणि युतीतील काहींनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केलेली छुपी मदत यामुळे ही लढत आणखी लक्षवेधी ठरली आहे. पैशाचा खुलेआम वापर, त्यातून झालेल्या जोडण्या आणि अखेरच्या टप्प्यात काहींनी प्रा. मंडलिक यांच्या प्रचारापासून घेतलेली फारकत या पार्श्‍वभूमीवर निकालाचा अंदाज बांधणे मुश्‍कील झाले आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर हल्लाबोल करत भाजपसोबत गेलेले हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोरही मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांच्यासमोर हे आव्हान उभे केले आहे. प्रचारात झालेला जातीचा वापर, भाजपच्या विरोधात गेल्याने शेट्टी यांच्याविरोधात युतीच्या नेते, कार्यकर्त्यांनी लावलेली ‘फिल्डिंग’ यामुळे या मतदारसंघात शेट्टी हॅट्‌ट्रीक करणार की त्यांची ही हॅट्‌ट्रीक श्री. माने मोडणार, याविषयी उत्सुकता आहे. 
या निवडणुकीत श्री. शेट्टी यांनी भूमिका बदलली असली तरी शेतकऱ्यांशी त्यांची जुळलेली नाळ घट्ट आहे. या जोरावर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांच्या विरोधात अख्खं सरकारच लागल्यासारखी स्थिती होती. 

कोल्हापूरचा इतिहास वेगळाच
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला, तर सत्तेविरोधात लोकांनी कौल दिला आहे. २००९ मध्ये देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार निवडून आले, पण कोल्हापूरकरांनी अपक्ष कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या गळ्यात  विजयाची माळ घातली. २०१४ च्या निवडणुकीत देशभरात मोदी लाटेने राज्यात दोन्ही काँग्रेसचा सुपडासाफ झाला, पण कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी वावटळीत दिवा लावला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha election Kolhapur, Hatkanangale constituency special