आता माढ्यातून कोण? भाजप-राष्ट्रवादीसमोर गहन प्रश्न!

Politics
Politics

सत्तेच्या चक्रव्यूहात अडकून राजकीय अस्त झाल्याची अनेक उदाहरणे सोलापूरसह महाराष्ट्रात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समान अंतरावर ठेवून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांचा समविचारी ग्रुप सत्तेचे चक्रव्यूह भेदत आहे. आज चर्चा माढ्याची असो की सोलापूर लोकसभेची. या समविचारी ग्रुपचा होकार घेतल्याशिवाय कोणालाही दिल्लीचा मार्ग सुकर होत नाही. 

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजप-शिवसेना सत्तेवर आली तेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय क्रांती झाली. १९९५ला युती सत्तेत आली आणि (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मोठा गट सत्तेसाठी भाजपच्या कुशीत गेला. जिल्ह्याच्या राजकारणातील विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही गटांवर आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी मोहिते-पाटील कुटुंबीयांची ही खेळी काही काळ यशस्वी ठरली. भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर (कै.) मोहिते-पाटील यांची राजकीय कारकीर्दच काँग्रेसच्या फक्त एका आमदारकीवर संपुष्टात आली.

(कै.) मोहिते-पाटील यांनी थेट भाजपत जाऊन माळशिरसमधील सुभाष पाटील यांच्या गटासह व जिल्ह्यातील भाजपच्या गटावर ताबा मिळविला होता. त्‍यामुळे पक्ष म्‍हणून भाजपचे अस्‍तित्‍व धोक्‍यात आले होते. सत्ता गेल्‍यानंतर भाजपला याचा मोठा राजकीय तोटा सहन करावा लागला. 

मोहिते-पाटील यांनी तेव्हा खेळलेली खेळी आज निमगावचे शिंदे कुटुंबीय खेळत आहे. बबनदादा शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीची आमदारकी आहे तर समविचारीच्या माध्यमातून संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले आहे. अध्यक्ष संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक यांनी मात्र राष्ट्रवादी आणि भाजपच्या काठावर उभा राहून समविचारीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणाचा ताबा घेतला आहे. हा ताबा घेताना भाजपच्‍या अस्‍तित्‍वाला धक्‍का लागू दिला नाही. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री देवेंंद्र फडणवीस.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मर्जी या समविचारीवर आहे.  शिंदे-परिचारक या जोडगोळीच्या चाणाक्ष खेळीमुळे आज खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यांना राष्ट्रवादीतही थांबता येईना आणि भाजपमध्ये जाता येईना. हा समविचारी ग्रुप भाजपमध्ये गेला असता तर मोहिते-पाटलांसाठी राष्ट्रवादीचे मैदान मोकळे झाले असते. हा ग्रुप राष्ट्रवादीत आला असता तर मोहिते-पाटील यांना भाजपचे मैदान मोकळे झाले असते. काठावर थांबल्याने आज समविचारी ग्रुप विरोधकांना शह सोबतच सत्तेचा चक्रव्यूह भेदत आहे. माढ्याच्या खासदारकीसाठी समविचारीचा होकार कोणाला? हा राजकीय सस्पेन्स संजय शिंदे यांनी कायम ठेवला आहे. संजय शिंदे यांनी समविचारी मैत्रीचा धागा पालकमंत्री देशमुख, आमदार सिध्‍दाराम म्‍हेत्रे, आमदार परिचारक, माजी आमदार शहाजीबापू पाटील, उत्तमराव जानकर यांच्यासह फलटणचे रणजितसिंह निंबाळकर आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यापर्यंत भक्कम केला आहे. समविचारीच्या ताकदीचा परिणाम म्हणजे २०१९ मध्ये माढ्यातून कोण? हा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोघेही चाचपटताना दिसत आहेत.

जागा शिवसेनेच्या, ओढा भाजपचा
भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर संजय शिंदे भाजपमध्ये जातील असाच अनेकांचा अंदाज होता. सत्तेच्या चक्रव्यूहात अडकलेली अनेक उदाहरणे शिंदे यांच्या डोळ्यासमोर घडल्याने त्यांनी हा सस्पेन्स कायम ठेवला. साडेचार वर्षे भांडणारी शिवसेना-भाजप आता युतीचे गोडवे गाऊ लागली आहे. समविचारी ग्रुपमधील संजय शिंदे, प्रशांत परिचारक, राजाभाऊ राऊत, शहाजीबापू पाटील, विजयराज डोंगरे हे भाजपच्या जवळ आहेत. हे नेते ज्या मतदार संघातून विधानसभेत जाऊ इच्छितात ते करमाळा, पंढरपूर- मंगळवेढा, बार्शी, सांगोला आणि मोहोळ (राखीव असल्याने प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला येतात. समविचारी ग्रुपचा भाजपकडे ओढा असला तरी या जागा शिवसेनेकडे आहेत. विधानसभेचे हे राजकीय कोडे लोकसभा निवडणुकीनंतर सुटणार की लोकसभा निवडणुकीपूर्वी यावर जिल्ह्याची राजकीय कलाटणी अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com