लोणंद ते फलटण रेल्वे ४० दिवसांत धावणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

लोणंद-फलटण-बारामती लोहमार्गावरील लोणंद ते फलटण दरम्यानच्या लोहमार्गावर येत्या ४० दिवसांच्या आत रेल्वे धावली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. लवकरच या मार्गावर पुन्हा एकदा रेल्वेची चाचणीही होणार असल्याची माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

फलटण शहर - लोणंद-फलटण-बारामती लोहमार्गावरील लोणंद ते फलटण दरम्यानच्या लोहमार्गावर येत्या ४० दिवसांच्या आत रेल्वे धावली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. लवकरच या मार्गावर पुन्हा एकदा रेल्वेची चाचणीही होणार असल्याची माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. या निमित्ताने माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर व फलटणच्या जनतेचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.

दिल्ली येथे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. श्री. गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान रणजितसिंह यांनी लोणंद ते फलटण या लोहमार्गाविषयीची सर्व परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली व या मार्गावरून फलटण-लोणंद-पुणे अशी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही केली. चर्चेदरम्यान श्री. गोयल यांनी संबंधित विभागास तातडीचे आदेश देत येत्या ४० दिवसांमध्ये फलटण-लोणंद रेल्वे सुरू झाली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. फलटणच्या रेल्वेप्रश्नी माजी खासदार हिंदूराव निंबाळकर यांनी केलेला संघर्ष, संसदेत केलेला पाठपुरावा सर्वश्रुत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या लोहमार्गास मंजुरी मिळाली होती.

लोणंद-फलटण-बारामती असा लोहमार्ग असला तरी लोणंद ते फलटण दरम्यान सर्व कामे पूर्ण झाली असल्यामुळे फलटण ते पुणे, फलटण ते मुंबई व फलटण ते कोल्हापूरपर्यंत या मार्गावरून रेल्वे धावावी यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता खासदार रणजितसिंह यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लोणंद ते फलटण या मार्गावर रेल्वे धावणार असल्याने माजी खासदार हिंदूराव निंबाळकर व फलटणच्या जनतेचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी लोणंद-फलटण लोहमार्गाबाबत दिलेल्या निर्देशांची माहिती मिळताच फलटण शहरात व तालुक्‍यात ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व जल्लोष साजरा केला. जनतेने जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यात माजी खासदार हिंदूराव निंबाळकर व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिलेले योगदान तालुक्‍यातील जनता कदापि विसरणार नाही, अशा प्रतिक्रियाही या निमित्ताने कार्यकर्ते व नागरिकांमधून व्यक्त झाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonand to Faltan Railway Piyush Goyal