गुंडांच्या हल्ल्यात तीन पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

झणझणे सासवड येथील घटना; पोलिसांच्या गोळीबारानंतर संशयित फरार

झणझणे सासवड येथील घटना; पोलिसांच्या गोळीबारानंतर संशयित फरार
लोणंद - अट्टल गुन्हेगार संज्या नमण्या पवार ऊर्फ नवनाथ पवार याने आज त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तलवार, कोयता व दगडांनी हल्ला केला. त्यात तीन पोलिस जखमी झाले. पोलिसांच्या खासगी मोटारीचेही त्यांनी नुकसान केले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात संज्या पवार डाव्या पायाला गोळी लागून जखमी झाला. मात्र, त्या अवस्थेतही तो व त्याचे नातेवाईक पळून गेले. याबाबत पवारसह त्याच्या अन्य सहा नातेवाईकांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झणझणे सासवड (ता. फलटण) येथील वडाचामळा (बेंद वस्ती) येथे आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत घटनास्थळावरून व लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अट्टल गुन्हेगार संज्या पवार (सध्या रा. वडाचामळा-बेंदवस्ती, झणझणे सासवड, ता. फलटण) याच्यावर खून, दरोडा, घरफोड्या आदी विविध प्रकारचे 13 गंभीर गुन्हे लोणंद पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

पुणे, फलटण, सातारा आदी ठिकाणी याच प्रकारच्या अनेक गुन्ह्यांत तो पोलिसांना हवा आहे. तो आज वाठार स्टेशन बाजूकडून झणझणे सासवडकडे येत असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुलकुमार भोळ यांना मिळाली. त्यानुसार श्री. भोळ व पोलिस कर्मचारी श्री. जगदाळे व श्री. काळे खासगी गाडीतून वाठार स्टेशनच्या दिशेने निघाले. मात्र, संज्या पवार झणझणे सासवड येथे आल्याची माहिती त्यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार ते झणझणे सासवड येथे वडाचामळा-बेंदवस्ती येथे त्याच्या राहत्या पालावर पोचले.

संज्या पवार याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने व त्याचा जावई, पत्नी, मुली व अन्य सहा ते सात नातेवाईकांनी पोलिसांवर तलवार, कोयता, काठी, खुरपे व दगडांनी हल्ला केला. पोलिस हवालदार जगदाळे यांच्या पाठीवर कोयत्याचा वार लागला. अन्य दोघेही किरकोळ जखमी झाले. संज्या पवारच्या साथीदारांनी पोलिसांच्या मोटारीचेही (एमएच 11 एडब्ल्यू 2061) दगडाने व काठ्यांनी नुकसान केले. दरम्यान, उपनिरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात संज्या पवार जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली. मात्र, त्या अवस्थेतही तो व त्याचे नातेवाईक पळून गेले. जखमी पोलिसांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळी दुपारपर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला होता. उपनिरीक्षक भोळ यांनी संज्या नमन्या ऊर्फ नवनाथ पवार, नमन्या ऊर्फ नवनाथ पवार, छाया नमन्या ऊर्फ नवनाथ पवार, सूरज संज्या पवार, जावई शिंदे, रोहिणी संज्या पवार व अन्य एक मुलगी आदी सहा ते सात जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, फलटणचे उपअधीक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक अशोक शेळके, लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले, साखरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदींनी भेट दिली. निरीक्षक संदीप भोसले अधिक तपास करत आहेत.

Web Title: lonand news three police injured in gund attack