लोणंद, शिरवळ परिसराच्या विकासाला खीळ

रमेश धायगुडे
सोमवार, 3 जुलै 2017

चौपदरीकरण रखडल्याने अपघातांत अनेकांचे गेले जीव, अनेकांना आले अपंगत्व
लोणंद - बारामती-लोणंद-शिरवळ या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून लोणंद ते वीर धरणापर्यंत शेतकरी, शासन, न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात अडकल्याने अर्धवट अवस्थेत रखडले आहे. परिणामी लोणंद व शिरवळ परिसरातील विकासाला खीळ बसली आहे. या मार्गावरील सर्वच गावांना त्याचा फटका बसला आहे. रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे आजवर अनेक अपघात होऊन लोकांना जीव गमवावे लगले, अनेकांना गंभीर दुखापती व अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. हा रस्ता कधी होणार, हाच प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.

चौपदरीकरण रखडल्याने अपघातांत अनेकांचे गेले जीव, अनेकांना आले अपंगत्व
लोणंद - बारामती-लोणंद-शिरवळ या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून लोणंद ते वीर धरणापर्यंत शेतकरी, शासन, न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात अडकल्याने अर्धवट अवस्थेत रखडले आहे. परिणामी लोणंद व शिरवळ परिसरातील विकासाला खीळ बसली आहे. या मार्गावरील सर्वच गावांना त्याचा फटका बसला आहे. रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे आजवर अनेक अपघात होऊन लोकांना जीव गमवावे लगले, अनेकांना गंभीर दुखापती व अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. हा रस्ता कधी होणार, हाच प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.

बारामती, फलटण, लोणंद, शिरवळ व पुणे या शहरांना जोडणारा व विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा रस्ता म्हणून बारामती-लोणंद-शिरवळ या ८० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २००९ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने आयव्हीआरसीएल या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू करण्यात आले होते. प्रारंभी शिरवळ बाजूकडून हे काम धुमधडाक्‍यात सुरू करून प्रथम या मार्गावरील पुलांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. शिरवळपासून वीर धरणापर्यंत चौपदरी रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे. भादे, वाठार हद्दीत व पुढे लोणंद औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतही चौपदरीकरणाचे काहीअंशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, वीर धरण भादे व त्यापुढे मधल्या टप्प्यातील शेडगेवाडी, अंदोरी व लोणंद हद्दीत या रस्त्याचे काम रखडले आहे. 

खंडाळा तालुक्‍यातून हा रस्ता जाताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीतून तसेच अनेक घरादारावर नांगर फिरवून रस्ता जात असल्याने शासनपातळीवरून त्याची योग्य भरपाई मिळावी, यासाठी २०१२ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख व भाजपचे विद्यमान नेते पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंदोरी येथे शेतकऱ्यांनी या मागणीसाठी रस्त्यावर उतरून या रस्त्याच्या कामास विरोधी आंदोलन छेडले. त्यानंतर शासनपातळीवरून एकूण शेतकऱ्यांपैकी ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांना विश्वासात घेवून प्रति गुंठा नऊ हजार ऐवजी २५ हजार रुपयांपर्यंत मोबदला दिला. ज्यांची घरेदारे जात आहेत, त्यांनाही मोबदला देण्यात आला आहे.

शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून तसे लेखी स्वरूपात संमतीपत्रही घेतले आहे. उरलेल्या काही शेतकऱ्यांनी मात्र हे पैसे घेण्यास नकार देवून केंद्र शासनाच्या २०१३ च्या जीआरनुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रेडिरेकनरनुसार योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी शासन व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने करूनही शासनाने अथवा अन्य कोणी या मागणीची दखल न घेतल्याने अंदोरी, शेडगेवाडी, दापकेघर व भादे येथील काही शेतकऱ्यांनी श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१५ मध्ये त्या याचिकेवर निकाल होवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रेडिरेकनरनुसार मोबदला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

मात्र, त्या निर्णयावरही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाही झाली नाही. अंदोरीत मातंग व बौद्ध वस्तीतील १५ ते २० कुटुंबांची घरे रस्ता रुंदीकरणात जात असल्याने या कुटुंबांना बेघर व्हावे लागत आहे. शासनाकडून मिळणारी भरपाईची रक्कम त्यांना जागा घेण्यासाठीही पुरत नाही. गावात गायरान, गावठाणात व अन्य कोणतीही शासकीय जागा उपलब्ध नसल्याने त्यांचे पुनर्वसनही होत नाही. यासाठी या कुटुंबांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढून तसेच येथे बुवासाहेब वस्तीकडून येणाऱ्या गावातील जोडरस्त्यावर उड्डण पूल व्हावा, अशी मागणीही येथील ग्रामस्थ करत आहेत. लोणंद येथेही जमिनीचे मोठे क्षेत्र या रस्त्यात जात असून येथील शेतकरीही रेडिरेकनरनुसार नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. तसेच येथे रेल्वे उड्डण पूल होताना हा मातीच्या भराव्याचा न होता सिमेंट काँक्रिटचा पिलर्स उभारून व्हावा, अशी मागणी आहे. येथील पंजाब कॉलनीचाही काही भाग रस्ता रुंदीकरणात जात असल्याने त्यांचाही प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. गेल्या वर्षी रस्ते विकास महामंडळाकडून या रस्त्याची एक पट्टी डांबरीकरण करून या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र, सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. या सर्व प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशीच मागणी येथील प्रवासी व नागरिक करत आहेत.

अदोरी, शेडगेवाडी, दापकेघर व भादे येथील ७० ते ८० शेतकरी लढ्यात सामील आहेत. आजवर उच्च न्यायालयामध्ये ५१ हेलपाटे घातले आहेत. आणखी कितीही वेळा न्यायालयात जावे लागले तरी या शेतकऱ्यांना निश्‍चित न्याय मिळवून देणार आहे. मात्र, ज्यांनी २५ हजार रुपयांची रक्कम यापूर्वी स्वीकारली आहे, त्या शेतकऱ्यांना मात्र वाढीव रक्कम मिळवताना मोठी अडचण येणार आहे. शासनाच्या विरोधात पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या पावित्र्यात येथील शेतकरी आहेत.
- पुरुषोत्तम जाधव, भाजप नेते

अंदोरीत रस्त्यात बागायती जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे. आज ना उद्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील. मात्र, येथील मातंग व बौद्ध वस्तीतील १५ ते १६ कुटुंबांची घरे रस्ता रुंदीकरणात जात आहेत. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मिळणारी रक्कम आजच्या बाजारभावानुसार अपुरी पडत आहे. शासनाने या कुटंबांना भरीव भरपाई द्यावी. शासनाने सर्व प्रकराचे प्रश्न लवकरात लवकर सोडवून रस्त्याचे काम पूर्ण करावे.
-अशोक धायगुडे, प्रकल्पग्रस्त शेतकरी व माजी उपसरपंच, अंदोरी

Web Title: lonand satara news lonand shirwal development issue