निंबोडी, पाडळी, खेडमध्ये वाळू माफियांचा उच्छाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

ओढे, नाले, पाझर तलाव, धरणांची चाळण; कार्यकर्ते व स्थानिक पुढारीच पुढे 

ओढे, नाले, पाझर तलाव, धरणांची चाळण; कार्यकर्ते व स्थानिक पुढारीच पुढे 
लोणंद - खंडाळा तालुक्‍यातील निंबोडी, पाडळी, खेड बुद्रुक, सुखेड, बोरी, कोपर्डे आदी गावांत गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक वाळू माफियांनी हैदोस घातला असून, मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. त्यांनी ओढे, नाले, पाझर तलाव व धरणांची अक्षरश: चाळण केली आहे. तांबवे (ता. फलटण) हद्दीतही तांबवे धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू उपसली जात आहे. वाळू उपसण्याच्या नादात अनेक गावांतील तलाव व बंधारे पूर्णपणे उद्ध्वस्त करून वाळू माफियांनी शासकीय मालमत्तेचेही मोठे नुकसान केले आहे. वाळूउपसा करण्यात विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व पुढारीच पुढे असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, शासकीय अधिकारी मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. परिणामी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. गौण खनिज व अवैध वाळू उपशाची शासकीय पातळीवरून त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच महसुलापोटी लाखोंचा दंड वसूल करावा, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

खंडाळा तालुक्‍यात गावागावांतील ओढ्यांवर छोटे-मोठे तलाव व धरणांची संख्या अधिक आहे. यावर्षी धोम-बलकरवडीचे पाणी न सुटल्यामुळे व अद्यापपर्यंत चांगला पाऊस न झाल्यामुळे कोणत्याच धरणात व तलावात पाणी साठले नसल्यामुळे वाळू माफियांची चांदीच झाली आहे. अनेक ठिकाणी तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसली जाताना दिसत आहे. गावागावांत विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यांनी आता आपला मोर्चा वाळू उपशांकडे वळवला आहे. एकेकाळी मजुरी करणारे आता ‘वाळू सम्राट’ बनले आहेत. जेसीबी, पोकलॅन्ड, डंपर, ट्रॅक्‍टरचे मालक झाले आहेत. गळ्यात अंगठ्याएवढ्या सोन्याच्या चेन घालून गावातून बलोरो व स्कॉर्पिओसारख्या महागड्या गाड्यातून युवक फिरताना दिसू लागले आहेत. मात्र, शासकीय पातळीवरून ज्या हेतूने धरणे, बंधारे, पाझर तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे गावागावांत बांधले आहेत किंवा बांधले जात आहेत, त्यामागे जमिनीच्या पाण्याची पातळी वाढून शेतीला पाणी मिळावे, हा मुख्य उद्देश आहे. मात्र, त्याचे भान या वाळू चोरट्यांना व त्याला खतपाणी खालणाऱ्या गावपुढाऱ्यांना अथवा शासकीय यंत्रणेलासुध्दा उरले नाही. गावागावांतील धरणे, पाझर तलाव व छोटे- मोठे बंधारे आता खड्ड्यांच्या साम्राज्यात बुडाले आहेत, उथळ झाले आहेत. या तलावात पाणी साठणार कसे? असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना आहे.

निंबोडी गावच्या शेतीला फायदेशीर ठरणारा निंबोडी-पाडळी सीमेवरच्या पीरसाहेब तलावातूनही निंबोडी व पाडळी येथील वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून या तलावाची अक्षरशः चाळण केलेली आहे. त्यामुळे या तलावात यापुढे कितपत पाणी टिकून राहील, हा प्रश्न आहे.

निंबोडी गावच्या तांबवे धरणातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीनजीकचा जुना पाझर तलाव तर वाळू माफियांनी अक्षरशः पूर्णपणे उद्‌ध्वस्त करून वाळू उपसा केला आहे. स्मशानभूमीनजीकचा कृषी खात्याचा बंधाराही अर्धा उखडला आहे. खेड बुद्रुक, पाडळी, कोपर्डे, बोरी व सुखेड या गावांतही अशीच परिस्थिती असून, रात्रीच्या वेळी गावागावांत ओढे व तलावांमधून जेसीबी, पोकलॅन्ड, डंपर, ट्रॅक्‍टरच्या धडाडण्याचाच आवाज कानी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील शेतकरी व सामान्य नागरिक मात्र वाळू माफियांच्या या प्रकारांमुळे पुरते हैराण व हतबल झाले आहेत. तालुक्‍यातील गावागावांत अशी गंभीर स्थिती असताना महसूल प्रशासन व पोलिस यंत्रणा मात्र जाणीवपूर्वक डोळे मिटून गप्प बसली आहे. वाळू माफियांनी पैशाच्या जोरावर या सर्व यंत्रणांना खिशात घातले असल्याने त्यांना कोणाची भीतीच उरली नसल्याचे चित्र आहे. उलटपक्षी या दोन्ही शासकीय यंत्रणा वाळू माफियांचे हस्तक म्हणूनच वावरत असल्याचा संशयही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. यासाठी शासनाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून वाळू माफियांवर त्वरित कडक कारवाई करून त्यांच्यावर खटले दाखल करण्याबरोबर शासकीय दंडाची वसुली व नुकसानभरपाई करून घ्यावी, अशी मागणीही येथील नागरिकांकडून केली जात आहे.

शेतात घुसून, प्रसंगी मारहाण करून वाळूचोरी
ओढे व तलावांतील वाळू संपत आल्यामुळे वाळू उपशाला मर्यादा येऊ लागल्याने वाळूचोरांनी आता आपला मोर्चा खासगी शेतकऱ्यांच्या शेतातील वाळू शोधून ती उपसण्याकडे वळवला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वाळू आहे, अशा शेतकऱ्यांची तर ऱात्रीची झोपच उडाली आहे. वाळू चोरटे केव्हाही रात्रीच्या वेळी कोणाच्या शेतात घुसून जेसीबी, पोकलॅन्ड लावून दमदाटी व वेळप्रसंगी मारहाण करून वाळू चोरून नेण्याचे प्रकारही करू लागले आहेत. या प्रकारामुळे गावागावांतील शेतकरी व नागरिकांच्यात भीतीचे वातावरण असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यात पोलिसांनी आपला वचक वाढवण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: lonand satara news sand mafia