लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या जानेवारीपर्यंत आरक्षित

संतोष भिसे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मिरज - गणेशोत्सव, दसरा आणि सणांच्या सुट्ट्यांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेची आरक्षणे फुल्ल होऊ लागली आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या जानेवारीपर्यंत आरक्षित आहेत. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी आतापासूनच घाई केलेली बरी अशी स्थिती आहे.

मिरज - गणेशोत्सव, दसरा आणि सणांच्या सुट्ट्यांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेची आरक्षणे फुल्ल होऊ लागली आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या जानेवारीपर्यंत आरक्षित आहेत. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी आतापासूनच घाई केलेली बरी अशी स्थिती आहे.

दिवाळी सुट्ट्यांच्या पर्यटनासाठी नोकरदार आणि व्यापारी वर्ग दोन-तीन महिने अगोदरच आरक्षणे करुन ठेवतो. विशेषतः दक्षिण आणि उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या खुपच लवकर फुल्ल होतात. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान येथून हजारोंच्या संख्येने कामगार महाराष्ट्रात कामासाठी येतात. दसरा-दिवाळीला त्यांचा परतीचा प्रवास हमखास ठरलेला असतो. त्यामुळे रेल्वेची आरक्षणे मिळणे मुश्‍किल होते. त्याचे प्रत्यंतर आतापासूनच येऊ लागले आहे.

अजमेर-म्हैसूर द्वि साप्ताहिक एक्‍सप्रेस ऑक्‍टोबरमध्ये फुल्ल होऊ लागली आहे. सुट्टीत तिरुपतीला बालाजीला जाणाऱ्यांसाठी सुदैवाने नोव्हेंबरमध्ये जागा उपलब्ध आहे. परत येणारी गाडी मात्र हळूहळू फुल्ल होत आहे. 

प्रवाशांचा नेहमीच प्रचंड प्रतिसाद असलेली महालक्ष्मी एक्‍सप्रेसला नोव्हेंबरच्या दिवाळी सुट्ट्यांसाठी मागणी वाढू लागली आहे. कोल्हापूर व मुंबईच्या नोकरदारांनी आतापासूनच जागा पकडलेली बरी. कोल्हापूर-गोंदीया महाराष्ट्र एक्‍सप्रेसही दसऱ्याच्या सुट्ट्यांसाठी रिकामी आहे; पण दिवाळीसाठी फुल्ल होत आहे. दिवाळी सुट्ट्यांसाठी गावी गेलेले विदर्भवासी या गाडीने परततील; त्यामुळे जागा भरु लागल्या आहेत.

बंगळुरुकडे जाणाऱ्या राणी चन्नम्मा एक्‍सप्रेसमध्येही दसरा-दिवाळीसाठी अद्याप जागा शिल्लक आहे. यशवंतपूर-निजामुद्दीन, बंगळुर - गांधीधाम या गुजराती व्यापाऱ्यांच्या पसंतीच्या एक्‍सप्रेस दिवाळीसाठी फुल्ल झाल्या आहेत. सध्या प्रतिक्षायादी सुरु आहे. संपर्कक्रांती एक्‍सप्रेसही दिवाळीसाठी प्रतिक्षायादी दर्शवत आहे. गोवा एक्‍सप्रेस दसऱ्यासाठी आताच भरुन गेली आहे. सह्याद्री एक्‍सप्रेसमध्ये मात्र अजुनही जागा मिळले.

काही हटके गाड्या
ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांनी काही वेगळ्या गाड्यांसाठी प्रयत्न केल्यास तिकीट मिळू शकते. हुबळी-कुर्ला एक्‍सप्रेस मिरजेत सोमवारी मध्यरात्री ( मंगळवारी पहाटे ) एक वाजता मिरजेत येते. मुंबई-पुण्याला जाणाऱ्यांसाठी ती उपयुक्त असून सर्रास रिकामीच असते. कोल्हापूर-हैदराबाद किंवा हैदराबाद-कोल्हापूर ही गाडीही बऱ्यापैकी रिकामीच असते. तिरुपती प्रवास करणाऱ्यांसाठी हा एक पर्याय आहे. रविवारी धावणारी पुणे-एर्नाकुलम्‌ ही गाडीही रविवारच्या अन्य गाड्यांच्या गर्दीवर उपाय आहे. महाराष्ट्र एक्‍सप्रेसच्या गर्दीवर कोल्हापूर- नागपूर ( पंढरपूरमार्गे ) ही गाडी पर्याय आहे. नागपुरला जाण्यासाठी सोमवारी व शुक्रवारी आणि परत येण्यासाठी बुधवारी व रविवारी ती धावते.

Web Title: long route Rail reservation full up to January