लॉरी असोसिएशन आंदोलनाच्या तयारीत

लॉरी असोसिएशन आंदोलनाच्या तयारीत

कोल्हापूर - ‘ट्रकांमध्ये माल भरणे आणि उतरवणे, यासाठीची हमाली परवडत नाही. हमाल वेळेत मिळत नाहीत. हमालांसाठी ट्रक मालकाला खिशातूनच पैसे द्यावे लागतात. म्हणूनच येथून पुढे ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ अशीच भूमिका घेणे आवश्‍यक आहे. यासाठीच रविवारी (ता. ४) दुपारी तीन वाजता सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या ट्रक आणि टेम्पो चालकांची व्यापक बैठक होईल आणि त्यात आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल,’ अशी भूमिका कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या आजच्या बैठकीत घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ट्रक आणि टेम्पो चालक, मालक यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी असोसिएशनची बैठक कार्यालयात झाली. अध्यक्ष सुभाष जाधव अध्यक्षस्थानी होते. हमाली, मालाचा विमा, डिझेल दरवाढ या सर्वांमुळे ट्रक मालक मेटाकुटीला आले आहेत. मल्टी ॲक्‍सल ट्रकमुळे चाके वाढली, पर्यायाने खर्च वाढला. जादा माल घेता येईल, असे वाटले होते; पण तसे काही झाले नाही. उलट भाडे कमी झाले आणि खर्च वाढला. रोड टॅक्‍स, टोल, टॅक्‍स, विमा, व्यवसायकर, प्रदूषणकर, वाहन आणि सुट्या भागांची किंमत आदींच्या खर्चात वाढ झाली असल्याने आता व्यवसाय करणे परवडत नाही. शासनाचे सर्व कर वाहतूकदार भरतो; मात्र राज्य आणि केंद्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, अशा भावना असोसिएशनचे पदाधिकारी आणि ट्रकचालकांनी मांडल्या. 

अध्यक्ष जाधव म्हणाले, ‘‘या सर्व प्रश्‍नांवर व्यापक विचार करून मार्ग काढणे आवश्‍यक आहे. ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ ही भूमिका योग्य आहे. तसेच ट्रकमधील मालाच्या विम्याची जबाबदारी माल देण्याऱ्याची असली पाहिजे. डिझेल दरवाढ, टोल, विमा या सर्व समस्यांवर आंदोलन करण्यासाठी एक व्यापक बैठक रविवारी (ता. ४) दुपारी तीन वाजता होईल. यामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि निपाणी येथील ट्रक चालक, मालक, लॉरी ऑपरेटर्स सहभागी होतील. यामध्ये आपण आंदोलनाची पुढील दिशा ठरवू.’’ 

असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, खजानीस प्रकाश केसरकर, संचालक बाबलशेठ फर्नांडिस, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमैय्या, तेजपाल बलदोटा, विलास पाटील, पंडित कोरगावकर यांच्यासह ट्रक चालक, ट्रक मालक, वाळू वाहतूक करणारे मालक उपस्थित होते.  

प्रमुख मागण्या....
० ज्याचा माल त्याचा हमाल
० ज्याचा माल त्याचाच विमा
० भरमसाट डिझेल दरवाढ कमी करावी
० थर्ड पार्टी इन्शुरन्स कमी करा
० प्रति वर्षी होणारी पाच टक्के टोलवाढ रद्द करा
० ट्रिपच्या खर्चावर आधारित योग्य वाहतूक भाडे द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com