फेसबुकवरील प्रेमाच्या महिन्याभरात सांगलीत दोन घटना

फेसबुकवरील प्रेमाच्या महिन्याभरात सांगलीत दोन घटना

सांगली - आईच्या पदराचा आसरा घेऊन वावरायचं वय मागे सरलं, कॉलेजचे दिवस सुरू झाले आणि पालकांनी मुलीच्या हट्टापोटी जगाशी कनेक्‍ट करणारा मोबाईल खरेदी करून दिला. पोरीनं फेसबुकचं खातं खोललं अन्‌ सुरू झाला मैत्रीचा सिलसिला. एकाशी चांगलीच मैत्री झाली अन्‌ बोलता बोलता ती त्याच्या प्रेमात पडली. तो नागपूरचा, ही सांगलीजवळची. एके दिवशी तिनं ठरवलं, आता तोच माझं आयुष्य आणि तिने घर सोडलं, गाडी पकडली अन्‌ तिनं नागपूर गाठलं...

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकसारखाच प्रसंग घडला आहे, शहरं वेगळी आहेत, मात्र दोन मुलींची आजची कथा आणि व्यथा खूपच टोकाची आहे. पहिल्या घटनेतील मुलगी जिल्ह्याच्या पूर्व भागातील. कॉलेज दिवसांत ती फेसबुकवर इतकी गुरफटली की चॅटिंगच्या माध्यमातून प्रेमात पडली. वय उणेपुरे सतरा वर्षे. त्यानं तिला स्वप्नाचं जग दाखवलं आणि त्या बोलण्यात ती गुरफटत गेली. पंधरा दिवसांपूर्वी तिने घर सोडले आणि थेट जाऊन त्याला भेटली. फिल्मी स्टाईलने त्याने कुठेतरी मंदिरात नेऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले.

आणाभाका घेऊन त्यांनी संसार सुरू केला. तिच्या पालकांनी तिचा शोध घ्यायला सुरवात केली, ती सापडली. पालकांनी त्या मुलाची पार्श्‍वभूमी पाहिली. मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल, हे जाणलं अन्‌ तत्काळ पालकांनी त्या मुलाविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा  दाखल केला. त्याच्याविरुद्ध ‘फोक्‍सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आता कारागृहात आहे, ती फेसबुक प्रेमाचा बळी ठरली आहे. चूक कुणाची?

दुसरी घटना अगदी वेगळी, दुसऱ्या टोकाची आहे. सांगली शहराजवळील साडेसतरा वर्षांची मुलगी. फेसबुकवरून प्रेमात पडली आणि तिने थेट नागपूर गाठले. ती येतेय, हे त्याला माहितीच नव्हते. ती प्रियकराच्या दारात उभी. त्याने तिला घरात घेतले. तिची विचारपूस केली. तिच्या पालकांना या गोष्टीची माहिती नसल्याचे ऐकून त्याला धक्का बसला. तो सुसंस्कृत घरातील. त्याने तिच्याविषयी प्रेमभावना व्यक्त केली, मात्र ही पद्धत चुकीची असल्याचे सांगून त्याने तिची समजूत काढली. तत्काळ त्याने मुलीच्या आईला मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांची मुलगी सुखरूप आहे आणि तिला तो परत सांगलीकडे पाठवतोय, असा निरोप दिला.

काही तासांनी ती सांगलीत आली आणि पालकांनी त्या मुलाचे हात जोडून धन्यवाद मानले, पण ते आजही मुलीच्या या निर्णयाच्या धक्‍क्‍यातून सावरलेले नाहीत. डिसेंबर २०१८ या एकाच महिन्यातील एकाच शहरालगतच्या या दोन घटना. त्याने पालकांसमोर प्रश्‍नचिन्ह उभे केले  आहे. यात चूक कुणाची?

‘तो’ पाकिस्तानातून परतताच म्हणाला...
फेसबुकवरील प्रेमिकेसाठी भारतातून अफगाणिस्तानात जाऊन पाकिस्तानात घुसखोरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर हमीद अन्सारी सहा वर्षे कारागृहात होता. कालच त्याची सुटका झाली आणि तो भारतात परतला. त्याला पत्रकारांनी तरुणांना काय संदेश देशील, असे विचारले. त्यावर तो म्हणाला,‘‘फेसबुकवरून प्रेमात पडू नका. माझी जी चूक झाली ती तुम्ही करू नका.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com