मदन भोसलेंच्या हातात कमळ?

Madan-Bhosale
Madan-Bhosale

वाई/ सातारा - आपल्या भवितव्यासाठी आणि कारखान्यांच्या सभासद हितासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची अपेक्षा व्यक्‍त करत वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील कार्यकर्ते, कारखान्यांचे सभासद यांनी आज माजी आमदार मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. 

दरम्यान, कार्यकर्त्यांकडून व्यक्‍त झालेली मते आणि सभासदांचा कौल आजमावणाऱ्या मदन भोसले यांनी आपली भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहे. 

किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांनी पायघड्या घातल्या आहेत. पण, अशा परिस्थितीतही काँग्रेसच्या चौकटीतून बाहेर न पडण्याचा निर्णय घेणारे श्री. भोसले यांनी आज वेळे (ता. वाई) येथे वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. 

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, रोहिदास पिसाळ, किसनराव भिलारे, जयवंतराव केंजळे, खंडूशेठ सारडा, राजेंद्र कदम, शेखर शिंदे, दिलावर बागवान यांच्यासह वाई, खंडाळ्यातील कारखान्याचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सुरवातीला सर्वांनी आपापली मते मांडली. यामध्ये काँग्रेस पक्षाशी आपली नाळ जोडली असल्याने इतकी वर्षे आपण पाळलेली तत्त्वे सोडायची का? असा प्रश्‍न काहींनी उपस्थित केला. तर काही कार्यकर्त्यांनी खंडाळा साखर कारखान्याच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मदत केली आहे. तसेच यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अडचणीच्या काळात मदत केली आहे. त्यामुळे खंडाळा व वाई तालुक्‍यांतील कारखान्यांच्या ५२ हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत व्यक्‍त केले. 

लोणंद येथील काँग्रेसच्या मेळाव्यास मदन भोसले यांना डावलल्याबद्दलही सर्वांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचा तालुक्‍याचा मेळावा असताना मदनदादांना बोलावले नाही. मुळात कोणालाही विश्‍वासात न घेता ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने पत्रिका छापल्या व त्यातून दादांचे नाव वगळले गेले होते.

यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वत: या चुकीबद्दल माफी मागितली होती. मात्र, तरीही दादांनी या कार्यक्रमाशी माझा काहीही संबंध नाही, मी येणार नाही, असे सांगितले होते. हा संदर्भही एका ज्येष्ठ नेत्याने सर्वांपुढे मांडला. 

या सर्व प्रकारानंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी मदन भोसलेंवर टीका करायला नको होती, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. खंडाळा, वाई व महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील जनता गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मदन भोसलेंच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे बहुतांशी कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी व कारखान्यांच्या ५२ हजार सभासदांच्या हितासाठी मदनदादांनी भाजप प्रवेश करावा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे भाजप प्रवेशाचा चेंडू आता पुन्हा एकदा मदन भोसले यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे येत्या काळात मदन भोसलेंच्या हातात कमळ येण्याने वाई तालुक्‍यात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

मंत्री गडकरीही भेटणार
पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारातील ताकदवान नेता भाजपकडे नाही. त्यामुळे ते मदन भोसलेंच्या भाजप प्रवेशासाठी आग्रही राहिले आहेत. खंडाळा व किसन वीर कारखान्याला मदत केल्यानंतर त्यांनी मदनदादांना पायघड्याच घातल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मदन भोसले यांच्याशी संपर्क करून मी कोल्हापूरला जाताना तुम्हाला भेटायला येतो, असे सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदन भोसलेंना पक्षात घ्यायचे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com