मदन पाटील कुटुंबियांच्या मालमत्ता जप्तीसाठी नोटीसा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेतील 247.75 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालिन अध्यक्ष व दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील व मुलींच्या नावावर असलेल्या दहा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी दिले आहेत. यासंदर्भात संबंधित वारसदारांना नोटीसा पाठवण्याची प्रक्रिया आज सुरु झाली आहे. कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा त्यामध्ये समावेश आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. 

सांगली, :  वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेतील 247.75 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालिन अध्यक्ष व दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील व मुलींच्या नावावर असलेल्या दहा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी दिले आहेत. यासंदर्भात संबंधित वारसदारांना नोटीसा पाठवण्याची प्रक्रिया आज सुरु झाली आहे. कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा त्यामध्ये समावेश आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. 

सहकारी बॅंकिंग क्षेत्रात दबदबा असणाऱ्या या बॅंकेतील तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य कर्जवाटप केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्ज प्रकरणात आक्षेप नोंदवले होते. कलम 72 (3) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत 107 खात्यांमधील 247.75 कोटीबाबत आरोप ठेवला होता. दोषारोप पत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, या प्रकरणातील कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची मालमत्ता विक्रीस काढली होती. वृत्तपत्रात त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाऱ्यांनी घेतली. 

भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशी अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 च्या कलम 88 व 95 मधील तरतुदीनुसार प्रकरणातील सर्व माजी संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश यापूर्वी दिले होते, मात्र याविरोधात माजी संचालकांनी महाराष्ट्र राज्य सहकार अपिलीय न्यायालयाच्या पुणे खंडपीठाकडे अपील केले होते. त्याची दखल घेवून न्यायालयाने हा जप्ती आदेश रद्द केला होता. यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा मालमत्ताजप्तीसाठी पुन्हा नोटीसा बजावल्या होत्या. यावरील सुनावणीचे कामकाज मागील आठवड्यात संपले. एकाच माजी संचालकांच्या वारसदारांनी मालमत्ता विक्रीचा प्रयत्न केल्याने सर्वच माजी संचालक अशी कृती करतील, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असा युक्तिवाद काहींनी केला होता. तो ग्राह्य धरून चौकशी अधिकाऱ्यांनी केवळ मदन पाटील यांच्या तिन्ही वारसदारांच्या दहा मालमत्ता जप्तचा आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा यात समावेश आहे. या नोटीसांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे

Web Title: Madan patil news esakal