माढ्यात अस्वस्थता, साताऱ्यात उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर, त्यांनी साताऱ्यातून लढावे, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. शरद पवार काय भूमिका घेणार, हे गुलदस्तात आहे. तरीही त्यांच्या उमेदवारीच्या ‘गुगली’ने माढ्यातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असतानाच काल श्री. पवार यांनी साताऱ्यातून लढावे, असा यॉर्कर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी टाकल्याने साताऱ्यातील राजकीय वर्तुळातही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्ह्याने १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसची पाठ सोडलेली नाही. त्यावेळेपासून खासदार व आमदारही राष्ट्रवादीचेच निवडून येत आहेत. त्यामुळे खासदार शरद पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही जिल्ह्याने भरभरून प्रेम केले असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या राष्ट्रवादीने लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याबात स्पष्टता होती. मात्र, सातारा व माढ्यातील उमेदवारीबाबत पक्षाध्यक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. या दोन्हीही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा प्रस्थापित खासदारांना विरोध होता. साताऱ्यात तो आमदारांनी थेट बोलूनही दाखविला होता. माढ्यातही तीच परिस्थिती होती. 

तेथे तर, प्रभाकर देशमुख यांनी गाव भेटींनाही सुरवात केली होती. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत उत्सुकता होती. 

दोन दिवसांपासून मात्र, या चर्चांना वेगळेच वळण लागले आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुद्द शरद पवार यांनीच माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी गळ घातली. त्यानंतर श्री. पवार यांनी तातडीने काल बारामतीत प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी प्रामुख्याने चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये फलटण, माण तालुक्‍यांतील परिस्थिती जाणून घेतली. रामराजेंनी त्यांना आकडेवारीसह सर्व माहिती दिली. त्यामुळे माढ्यामधून लढण्याबाबत शरद पवार चाचपणी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे त्यांनी माढ्याऐवजी साताऱ्यातून लढावे, अशीही अपेक्षा खुद्द विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण देशात सातारा जिल्हा त्यांना सर्वाधिक मताने निवडून देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पवारांच्या निर्णयाची जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पक्षाध्यक्षच साताऱ्यात मैदानात उतरले तर, खासदार उदयनराजेंची नेमकी भूमिका काय असणार, याची उत्सुकता जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पवारांनी अद्याप काही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळेच माढ्यात अस्वस्थता आणि साताऱ्यात उत्सुकता, अशी परिस्थिती आणि काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Web Title: Madha Satara Loksabha Election NCP Sharad Pawar Politics