बाॅम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी 'ती' रमली चित्रशैलीत

डॉ. शैलजा कळेकर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

डॉ. शैलजा कळेकर यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांनी साकारलेल्या ‘वारली’ आणि ‘मधुबनी’ या आदिवासी चित्रशैली अप्रतिम आहेत. त्यांच्या हा कलेबाबत त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया...

मला लहानपणापासून चित्रकलेची आवड. पण, करिअर, शिक्षण यामुळे हा छंद जोपासता आला नाही. २००७ मध्ये मुंबईत रेल्वेतील बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने माणसाचं जीवन आणि मरण अनुभवले. त्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी पुन्हा पेंटिंग करायला लागले. त्याच दरम्यान शिक्षणाच्या निमित्ताने पालघरला होते. त्यामुळे ‘वारली’ ही आदिवासी चित्रकला जवळून अनुभवता आली. त्यानंतर मात्र ‘वारली’ आणि ‘मधुबनी’ या आदिवासी चित्रशैलीच्या विश्‍वात रमून गेले. 

प्रत्येक आदिवासी कला ही एक वेगळी शैली असते. वारली पेंटिंग्जमध्ये वर्तुळ, त्रिकोण निर्मिती, आकृतीव्दारे कला साकारली जाते. निसर्ग, रोजची जीवनशैली, वन्य जीवन यांचे रेखाटन केले जाते. मधुबनी पेंटिंग्जमध्ये निसर्ग, प्राणी, विशेषतः हत्ती, मोर, कासव, मासा, पौराणिक कथा, देवतांचे महत्व, जीवनाचे चक्र या कलेतून दिसते. ‘मधुबनी’मध्ये व्हायब्रंट कलर्स वापरले जातात आणि खूप बारीक कामावर भर दिला जातो. या कला घरांच्या भितींवर रेखाटल्या जातात. 

मधुबनीमध्ये होतो याचा समावेश

‘मधुबनी’मध्ये लग्न सोहळ्यासाठी चंद्र, सूर्य, राधा-कृष्ण, शंकर-पार्वती, विड्याची पाने, लक्ष्मी, हत्ती प्रतीक, मासा, मोर, कासव अशी प्रतीके संदर्भ घेऊन चित्र साकारले जाते. आपल्यापुढे मोठी नैसर्गिक आपत्ती आली, तरच आपण निसर्गापुढे नतमस्तक होतो. पण, आदिवासी लोक निसर्ग हाच आपला राजा असे मानून आपली कला, संस्कृती जपतात. ही चित्रकला आपला प्राचीन कलेचा वारसा आहे. आजच्या आधुनिक, स्पर्धेच्या जगात आपल्याला ही कला अगदी सोप्या भाषेत भौतिक सुख-सुविधांपेक्षाही आयुष्य खूप सुंदर असल्याची जाणीव करून देते. मुळात निसर्गाला जपले तरच आपले अस्तित्व आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. त्यामुळे निसर्ग जतन व संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने आपलं कर्तव्य मानले पाहिजे. 

कलाकृतींचे मोठे प्रदर्शन भरवण्याचा मानस

आदिवासी कला जपतानाच त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच अशा कलाकृतींचे मोठे प्रदर्शन भरवण्याचा माझा मानस आहे.  

(शब्दांकन - संभाजी गंडमाळे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhubani Warali Painting By Dr Shilaja Kalekar