महाबळेश्‍वरमध्ये कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नगरपालिकेवर मोर्चा; वाहनतळ नामकरणाचा ठराव केल्याचे पडसाद

नगरपालिकेवर मोर्चा; वाहनतळ नामकरणाचा ठराव केल्याचे पडसाद
महाबळेश्वर - येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्याच्या पालिकेच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाबळेश्वर बंदला आज 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी श्रीराम मंदिराशेजारील सभागृहात बैठकीत पालिकेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर पालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवून नामकरणाचा केलेला ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हा ठराव रद्द होईपर्यंत महाबळेश्‍वर बंद ठेवण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील रे गार्डन वाहनतळास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ असे नामकरण करण्याचे जाहीर केले होते. तसा पालिकेने तेथे फलकही लावला होता. दरम्यान, काल (ता. 21) झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे नाव बदलून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा ठरावही करण्यात आला. नागरिकांच्या मागणीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट उसळली. पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महाबळेश्वर बंदची हाक देण्यात आली होती. शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. महात्मा गांधी मार्केट, रे गार्डन मार्केट, सुभाष चौक, बाजारपेठ, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले मार्केट, पार्सनेज्‌ मार्केट, वेण्णालेक येथे बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला.

पालिकेने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी श्रीराम मंदिरात जाहीर सभा झाली. सभेसाठी वाई येथून संभाजी भिडे गुरुजींचे कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारीही आले होते. जाहीर सभेत अनेकांनी विचार मांडले. पालिकेने जरी नामकरणाचा ठराव केला असला तरी तो होवू दिला जाणार नाही. फलकाला हात लावाल तर याद राखा, अशा शब्दांत वक्‍त्यांनी पालिकेला इशारा दिला. काहींनी नगरसेवकांचा शेलक्‍या शब्दांत समाचार घेतला. नगराध्यक्षा व नगरसेवकांचा जाहीर निषेध करण्यात आला. या सभेत माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, पी. डी. पारठे, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता जंगम, गोपाळ वागदरे, धोंडिरामबापू जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, हरिभाऊ संकपाळ, माजी नगरसेवक संतोष शिंदे, विशाल मोरे, संतोष काळे व संदीप जायगुडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत घाडगे, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सलीम बागवान, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, पंचायत समिती सदस्य आनंदा उतेकर, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे, लीलाताई शिंदे, तालुकाप्रमुख नितीन भिलारे, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, विजय भिलारे, शांताराम धनावडे, गणेश उतेकर यांनी सभेत मार्गदर्शन केले.

सभेनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा बाजारपेठमार्गे पालिकेवर गेला. पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी पालिका प्रवेशद्वारावर मोर्चा अडविला. शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आशा राऊत यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. नामकरणाचा ठराव पालिका मागे घेत नाही, तोपर्यंत महाबळेश्वर बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गायब
पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण सुरू आहे. कामानिमित्त काढलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा कोठे आहे? याची विचारणा शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी मुख्य लिपिक व अभियंत्यांना बोलावून विचारणा केली. परंतु, तेथे कोणालाच ठामपणे काही सांगता आले नाही. पुतळ्याबाबत माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली व तेथेच ठिय्या मारला. एक तासाच्या चर्चेनंतर राऊत यांनी शिष्टमंडळाला पुतळा पालिकेत नाही व तो कोठे आहे, याचा तातडीने शोध घेतला जाईल, असे लेखी पत्र दिले.

Web Title: mahabaleshwar close