हातगाडीवाल्यांना महाबळेश्‍वरात दणका; प्रत्येकी ५०० रुपये दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

महाबळेश्वर - पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा करत व्यवसाय करणाऱ्या दहा हातगाडीवाल्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला. 

महाबळेश्वर - पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा करत व्यवसाय करणाऱ्या दहा हातगाडीवाल्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला. 

महाबळेश्वर सध्या पर्यटनामुळे बहरत आहे. शनिवार, रविवार पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. त्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणामध्ये ताण वाढतो. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सुभाष चौक, एसटी स्टॅंड परिसर, इराणी पेट्रोल पंप परिसरातील अशा सुमारे दहा हातगाडीवाल्यांवर १०२, ११७ प्रमाणे कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी ५०० रुपये दंड भरून सोडण्यात आले, तसेच वाहनधारक आपले वाहन रस्त्यामध्ये थांबवतात व त्यामुळे वाहनकोंडी होते. अशा सुमारे दहा वाहनधारकांवर २८३ प्रमाणे तडजोड शुल्क भरून घेत खटले दाखल करण्यात आले. ज्यामुळे अशा वाहनधारकांना चाप बसेल व  ते वाहनकोंडी करण्यापासून परावृत्त होतील. पोलिस निरीक्षक नाळे यांच्या निरीक्षणानुसार अनेक चालक तडजोड शुल्क भरून वेळ मारून नेतात व परत तसाच त्रास नेहमी देत असतात. पकडले तर तडजोड शुल्क भरून वेळ मारून नेतात. अशा सुमारे दहा चालकांवर तडजोड शुल्क भरून न घेता त्यांच्यावर खटले भरून त्यांना न्यायालयात हजर केले.

मद्यपींवर कारवाई
दरम्यान, शहरात दारू पिऊन दंगा करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई करून त्यांनादेखील न्यायालयात हजर केले. मात्र, दंडात्मक कारवाई करून त्यांना न्यायालयाने समज देऊन सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahabaleshwar news police fine