हंगाम संपल्याने पोलिसही गायब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

महाबळेश्‍वर - शहरातील गरीब फेरीवाल्यांचा रोष पत्करून नगरपालिकेने सुभाष चौकात अतिक्रमणे काढली. परंतु, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष व पर्यटकांच्या बेशिस्तपणामुळे या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

महाबळेश्‍वर - शहरातील गरीब फेरीवाल्यांचा रोष पत्करून नगरपालिकेने सुभाष चौकात अतिक्रमणे काढली. परंतु, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष व पर्यटकांच्या बेशिस्तपणामुळे या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

महाबळेश्वरात सध्या १२ महिने पर्यटन सुरू असते. विकेंडची मजा लुटण्यासाठी पर्यटक येथे नेहमीच येतात. त्यामुळे येथे शुक्रवार, शनिवार व रविवार हमखास गर्दी होते. हे शहर पर्यटनावर अवलंबून असल्याने फेरीवाले प्रत्येक हंगामात व्यवसायासाठी विविध खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल लावतात. हळूहळू हे स्टॉल कायमस्वरूपी तेथेच उभे राहतात. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याबाबत तक्रारी वाढू लागल्या की नाईलाजास्तव पालिकेला अतिक्रमण विरोधी भूमिका घ्यावी लागते. 

शहराच्या सुशोभिकरण व सोयीसाठी येथील पालिकेने ऐन उन्हाळ्याच्या हंगामात अतिक्रमणे हटवली. येथील सुभाष चौकात मध्यभागी असलेल्या हातगाड्या हलवल्या गेल्या. चौक मोकळा झाला. परंतु, ही स्थिती जास्त दिवस राहिली नाही. वास्तविक उन्हाळी हंगामात मुख्य चौकात दोन पोलिस कर्मचारी तैनात होते. परंतु, हंगाम संपल्याने हे पोलिस काढल्याने वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे पर्यटकदेखील कशाही पद्धतीने वाहने लावून बाजारपेठेत फिरण्यासाठी जाताना दिसतात. त्यातून चौकात वाहतूक कोंडी होताना दिसते. अनेकवेळा स्थानिक व पर्यटकांत विनाकारण वाद होताना दिसतात.

आंबेडकर चौकातील वाहनतळ वापरण्याची गरज
वाहतुकीची समस्या ही महाबळेश्वर परिसरासाठी नवीन नाही. त्यावर अनेकवेळा उपाययोजना करूनही समस्या सुटलेली नाही. पालिकेचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहनतळ पूर्ण झाले असल्याने त्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी पालिकेने पर्यटकांना आवाहन करण्याची गरज आहे. पोलिसांनीही सुभाष चौकात वाहने लावण्यास मज्जाव केला पाहिजे. तरच वाहतूक कोंडीच्या समस्येवर मार्ग निघेल. 

Web Title: mahabaleshwar news police satara news