मिनीकाश्‍मीर पर्यटकांनी खुलले!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नगरपालिकेतर्फे नूतन वाहनतळ व ठिकठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. वेण्णालेकसह काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. पोलिस प्रशासन अधिक कुमक मागवून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- दत्तात्रय नाळे, पोलिस निरीक्षक, महाबळेश्‍वर

महाबळेश्वर  - दीपावली सुटीमुळे महाबळेश्‍वर, पाचगणी ही शहरे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पोलिसांनीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत.

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरात सध्या पर्यटकांची मोठी रेलचेल पाहण्यास मिळत आहे. दिवाळी सुटीत गुजरात राज्यातून आलेल्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.

पर्यटनास प्रसिद्ध केट्‌स पॉइंट, ऑर्थरसीट पॉइंट, श्री क्षेत्र महाबळेश्वरसह सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंट ही स्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. नौका विहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेकमध्ये आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. सोबतच घोडेसवारी, गेम्स, स्ट्रॉबेरीपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, चणे, थंडगार आइसक्रीम व बर्फ गोळ्यावर ताव मारताना पर्यटक पाहण्यास मिळत आहेत. दिवाळी हंगामामुळे सलग आलेल्या सुट्यांमुळे महाबळेश्वर गजबजून गेले आहे. वेण्णा लेक येथे पर्यटकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून, बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम खरेदीसाठी गर्दी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahabaleshwar satara news tourist in mini kashmir