वेण्णा धरणाच्या भिंतीतून पाणीगळती

महाबळेश्‍वर - वेण्णा लेक धरणाच्या भिंतीतून गुरुवारी पाण्याची गळती सुरू झाली आहे.
महाबळेश्‍वर - वेण्णा लेक धरणाच्या भिंतीतून गुरुवारी पाण्याची गळती सुरू झाली आहे.

हजारो लिटर पाण्याचा विसर्ग; भिंतीला धोका, शेतकरीही काळजीत
महाबळेश्वर - महाबळेश्वर येथील वेण्णा लेक धरणाच्या भिंतीतून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. त्यातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपाययोजना होण्याची गरज आहे.

वेण्णा लेक हा पर्यटकांसह शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या लेक धरणात साठविण्यात येणारे पाणी महाबळेश्वर व नवीन योजनेमुळे पाचगणीलाही पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहे. या धरणामध्येच बोटिंगचा व्यवसाय सुरू असल्याने त्यातून पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. परिसरातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह इतर शेती उत्पादनांसाठी या पाण्याचा उपयोग होतो.

पूर्वी 12 एम. सी. एफ. टी. (दशलक्ष घनफूट) क्षमतेच्या या धरणामध्ये वेण्णा लेक विस्तारित धरण योजनेनंतर पाणीसाठ्यात पाचपट वाढ झाली. या धरणाची क्षमता सुमारे 56 एम. सी. एफ. टी. झाली आहे.

सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या स्थितीतच धरणाच्या भिंतीच्या पायामधूनच मोठ्या प्रमाणात भगदाड पडले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने वेण्णा लेक धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याची माहिती मिळताच नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, या धरणाच्या बांधकामाबाबत नगरसेवक कुंभारदरे यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत आमदार मकरंद पाटील यांनी त्यावेळी धरणाच्या भिंतीतून होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला होता. त्या वेळी गळती काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते; परंतु आता पुन्हा धरणाच्या भिंतीच्या पायथ्याला मोठे भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com