महाबळेश्वर आगाराला ‘दे धक्का’!

सुनील कांबळे 
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पाचगणी - नादुरुस्त बस, चालक आणि वाहकांची कमतरता, सतत कोलमडलेले वेळापत्रक अन्‌ मनमानी कारभाराच्या विळख्यात अडकल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या सर्व अडचणींमुळे जिल्ह्यात पहिल्या स्थानावर असलेल्या महाबळेश्वर आगाराला उतरती कळा लागलेली दिसते.

पाचगणी - नादुरुस्त बस, चालक आणि वाहकांची कमतरता, सतत कोलमडलेले वेळापत्रक अन्‌ मनमानी कारभाराच्या विळख्यात अडकल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या सर्व अडचणींमुळे जिल्ह्यात पहिल्या स्थानावर असलेल्या महाबळेश्वर आगाराला उतरती कळा लागलेली दिसते.

महाबळेश्‍वर आगाराच्या माथी जुन्या गाड्यांचा भरणा आहे. गाड्यांमध्ये वारंवार होणारे बिघाड, वर्कशॉपमध्ये स्पेअरपार्टचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची कमतरता अशा विळख्यात हे आगार अडकलेय. जुन्या व नादुरुस्त गाड्यांची डागडुजी, रंगरंगोटी करून त्या प्रवाशांच्या दिमतीला ‘निमआराम’ म्हणून धाडल्या जातात. चालकांची अन्‌ वाहकांची कमतरता असल्याने गाड्या सुटण्याचे वेळापत्रक रामभरोसे आहे.

वेळापत्रक कोलमडले
चालकांची कमतरता असल्याने ऐनवेळी कोणाला कोणती ड्यूटी द्यायची, हे गाडी सुटेपर्यंत निश्‍चित होत नसल्याने गाड्या वेळेवर सुटत नाहीत. अनेकदा लांब पल्ल्याहून रात्री- अपरात्री आलेल्या चालकांना जराही उसंत न देता पुन्हा ड्यूटीवर धाडले जाते. त्यामुळे थकलेल्या चालकाला मानसिक तणावाचे ओझे घेऊन मोठी कसरत करावी लागते. 

नादुरुस्त गाड्या रस्त्यावर
आगारातून नाशिक, पणजी, मुंबई, बोरिवली व पंढरपूरसाठी एकूण आठ गाड्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये जुन्याच गाड्या नव्या ‘रिकंडिशन’ केलेल्या असल्याने अनेकदा मार्गस्थ होताना अनेकदा रस्त्यातच बंद पडल्याचे प्रकार घडतात. तालुक्‍याचा दुर्गम व डोंगराळ भागात गाडी बंद पडली, तर चालकाला अथवा वाहकाला मार्ग काढण्यासाठी कोसो दूर पायी चालावे लागते.

नियोजनशून्य कारभार
पहाटे साडेपाच वाजल्यापासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत वाई मार्गावरून महाबळेश्वरकडे धावणाऱ्या वाहनांची संख्या सात ते आठ आहे. मात्र, या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या नगण्यच दिसते. रात्री सातनंतर वाईहून पाचगणी, महाबळेश्वरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकही गाडी नसल्याने रात्री साडेदहापर्यंत वाई स्थानकावर ताटकळत बसावे लागते. पहाटे सहाला महाबळेश्वरहून सुटणारी महाबळेश्वर-मिरज गाडी बंद केल्याने नोकरदार, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शैक्षणिक संस्था बाहेर गावातील विद्यार्थ्यांसाठी खासगी गाड्यांना पसंदी देतात. त्यातून महामंडळाच्या उत्पन्नात घट होते. 

या वर्षी महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही बस स्थानकांतून प्रवाशांना सुविधा देण्यात यशस्वी झालो. मिरज- महाबळेश्वर बस १५ एप्रिलला सुरू होईल. शिवशाही तसेच शटल बससेवाही चांगल्या पद्धतीने देत आहोत.
- डॉ. विक्रम देशमुख,  आगारप्रमुख, महाबळेश्वर

Web Title: mahabaleshwar ST depo