प्री-कुलिंगमुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात! 

प्री-कुलिंगमुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात! 

काशीळ - महाबळेश्वरची चालचुटूक स्ट्रॉबेरी राज्यासह देशाभरामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, काढणीनंतर स्ट्रॉबेरीचे आयुष्य हे केवळ दोन दिवस असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी असूनही पाठवणे शक्‍य होत नव्हते. त्यासाठी स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवणे गरजेचे होते. यासाठी भिलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेताना "प्री-कुलिंग'ची यंत्रणा उभारली आहे. सोबत वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तीन प्री-कुलिंग युनिटही खासगीरित्या उभारले गेले आहे. अशा चार प्री-कुलिंग युनिटमध्ये सुमारे चार टन स्ट्रॉबेरी प्री-कुलिंग होऊन देशभरामध्ये पाठवली जाऊ लागली आहे. आयुष्मान दुप्पट झाल्याने नवी बाजारपेठ मिळवणे शक्‍य झाले आहे. 

राज्यामध्ये थंड हवेची म्हणून प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर, पाचगणी ही ठिकाणे स्ट्रॉबेरीसाठीही तेवढीच प्रसिद्ध आहेत. येथील स्ट्रॉबेरीचा गोडवा बहुतेकांना भुरळ पाडत असल्याने या तालुक्‍यातील स्ट्रॉबेरीला सर्वाधिक मागणी असते. महाबळेश्वर तालुक्‍यात या हंगामात सुमारे 1800 एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड असून, जिल्ह्यातील जावळी, पाटण, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्‍यांत सुमारे 1200 एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सध्या हंगामाचा पहिला बहर सुरू झाला आहे. मागील हंगामापर्यंत स्ट्रॉबेरी तोडली की लगेच कोरूगेटेड बॉक्‍स व पनेटमध्ये पॅकिंग करून बाजारपेठेत पाठवली जात असे. स्ट्रॉबेरी केवळ दोन दिवस टिकते, त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोचण्यात अडचणी येत होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी भिलार ग्रामपंचायतीने, तर वाई येथे किसनराव भिलारे यांनी प्री-कुलिंगची यंत्रणा उभी केली आहे. या तालुक्‍यातील काढणीनंतर कोरूगेटेड बॉक्‍समध्ये पॅक केलेली स्ट्रॉबेरी प्री-कुलिंग यंत्रणेत ते 0 ते +4 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड केली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे चार तास केली जाते. प्री-कुलिंगमध्ये बॉक्‍समधील व फळातील उष्ण हवा बाहेर काढली जाते. त्यामुळे फळांचा तजेलदारपणा टिकून राहतो. स्ट्रॉबेरी फळ जवळपास दुप्पट म्हणजे चार दिवसांपर्यंत टिकते. 

- चार दिवसांपर्यंत आयुष्मान वाढल्यामुळे दूरवरच्या उदा. कोलकाता, जयपूर, चेन्नई, दिल्ली अशा शहरांपर्यंत माल पोचवण्यासाठी वेळ मिळतो. 
- विमानाने पाठवताना स्ट्रॉबेरी सुमारे 20 किलो क्षमतेच्या थर्माकोल बॉक्‍समध्ये भरली जाते. बॉक्‍समध्ये जेल आइस पॅक वापरले जातात. 
या बॉक्‍समध्ये 0.4 अंश सेल्सिअस तापमान टिकून राहते. 
- तुलनेने जवळच्या हैदराबाद, बंगळूर, गोवा, मुंबई, अहमदाबाद, सुरत, पुणे या शहरांत शीतवाहनाद्वारे +2 अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्ट्रॉबेरी पाठवली जाते. 
- प्रतिकिलो फळे प्री-कुलिंगसाठी पाच रुपये आणि वाहतुकीसाठी 20 रुपये खर्च होतो. हा खर्च वाढला असला तरी फळाचा टिकाऊपणा वाढल्याने अधिक बाजारपेठ मिळवणे शक्‍य झाले. अगदी परदेशांतही काही प्रमाणात स्ट्रॉबेरी पाठवणे शक्‍य. 
- सध्या महाबळेश्वर तालुक्‍यातील प्रतिदिन चार टन स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया होऊन बाजारपेठेमध्ये पाठवली जात आहे. 
- सध्या भिलारमध्ये एक व वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये चार प्री-कुलिंग यंत्रणा कार्यरत आहेत. येथे प्री-कुलिंग करून स्ट्रॉबेरी पाठवली जाते. 

""काढणीनंतर स्ट्रॉबेरी अधिक टिकवण्याच्या उद्देशाने आम्ही प्री-कुलिंग यंत्रणेची तीन युनिट उभी केली आहेत. यातून दैनंदिन चार टन स्ट्रॉबेरीचे प्री-कुलिंग केले जाते. अगदी दूरवरच्या बाजारपेठेतील ग्राहकांपर्यंत ताजी व दर्जेदार स्ट्रॉबेरी पोचवणे शक्‍य झाले. पुढील काळात प्रत्येक शेतकऱ्याकडे ही यंत्रणा असणे, ही काळाची गरज ठरणार आहे.'' 
- किसनराव भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी-विक्री संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com