कर वसुलीत महाबळेश्‍वर अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सातारा - स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आघाडी घेणाऱ्या महाबळेश्‍वर पालिकेने कर वसुलीतही आघाडी घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. महाबळेश्‍वरने ९१ टक्के, त्याखालोखाल पाचगणी व कऱ्हाड पालिकेने जिल्ह्यात नंबर पटकावला आहे. जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या साताऱ्याला पालिकांमध्ये निचांकी अवघे ५० टक्केही वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले नाही. 

सातारा - स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आघाडी घेणाऱ्या महाबळेश्‍वर पालिकेने कर वसुलीतही आघाडी घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. महाबळेश्‍वरने ९१ टक्के, त्याखालोखाल पाचगणी व कऱ्हाड पालिकेने जिल्ह्यात नंबर पटकावला आहे. जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या साताऱ्याला पालिकांमध्ये निचांकी अवघे ५० टक्केही वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले नाही. 

शासनाने पालिकांना वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. एकत्रित मालमत्ता कर व पाणी कर ९० टक्के वसूल करणे अनिवार्य केले आहे. उद्दिष्टापर्यंत न पोचणाऱ्या पालिकांच्या शासन अनुदानावर विपरित परिणाम होऊ शकतो. पालिकांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या शासन अनुदानावर अवलंबून असते. त्यामुळे कर वसुली हा महत्त्वाचा घटक समजला जातो. 

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पालिकानिहाय कर वसुलीचा आढावा जिल्हा प्रशासनाने घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्‍वर पालिकेने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी मालमत्ता कर  ९२.३६ टक्के वसूल केला. पाणी करातही त्यांनी ९०.५० टक्के हे प्रमाण कायम राखले. त्याखालोखाल पाचगणीने मालमत्ता कराची ९२.२५ इतकी विक्रमी वसुली करून दाखवली. कऱ्हाड पालिकेने वसुलीचे प्रमाण गतवर्षाप्रमाणे कायम राखले. त्यांनी याहीवर्षी एकत्रित कर ८६ टक्के वसूल केला. सातारा पालिकेला अवघी ४९ टक्के पाणी कराची वसुली करता आली. मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण अवघे ६२ टक्के इतके आहे. 

विविध योजना कौशल्याने राबविणाऱ्या मलकापूरने नगरपंचायतींमध्ये अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान कायम राखले. पालिकांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवत मलकापूरच्या कर्मचाऱ्यांनी ९३.१६ टक्के मालमत्ता कराची वसुली करून दाखवली. या पंचायतीचे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण ८९. ३० टक्के इतके सर्वाधिक आहे. त्या खालोखाल कोरेगाव व दहिवडी नगरपंचायतींनी वसुलीत चांगली कामगिरी करून दाखवली.

वसुली मोहीम राबवावी
सातारा पालिकेसह पाटण व वडूज या नगरपंचायतींचे वसुलीच्या स्तरावरील काम निराशाजनक आहे. गतवर्षी पाटण व वडूज नगरपंचायतींची वसुली ५० टक्‍क्‍यांपेक्षाही कमी झाल्याने विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली होती. पाटण व वडूजबरोबर साताऱ्यातही विशेष वसुली मोहीम राबवावी लागण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: mahabaleshwar topper in tax recovery