महादरे तलावातील गाळ काढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सातारा - सुमारे १९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच महादरे तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सातारा नगरपालिकेने याकामी पुढाकार घेतला असून बुधवारी (ता. १६) या कामास सुरवात होईल. या कामी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाची मदत घेण्यात आली आहे. 

छत्रपती (थोरले) प्रतापसिंहराजे भोसले यांनी महादरे तलाव बांधला. आखीव-रेखीव दगडांत या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यवतेश्‍वर डोंगराच्या ओघळातून येणारे पाणी महादरे तलावानजीक हत्ती तळ्यात येते. त्यातून झिरपावाटे ते महादरे तळ्यात साठते. या तळ्याचे पाणी व्यंकटपुरा व चिमणपुरा पेठेस पुरवले जाते. उन्हाळ्याच्या तोंडावर हे तळे नेहमी कोरडे पडते. तळ्याची साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पालिकेने तळ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. 

या तळ्यात सध्या चार ते पाच फूट गाळ साचला आहे. तळे स्वच्छ करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी शाखेची मदत मिळणार आहे. या विभागाने डोजर, डंपर आदी साधनसामग्री पुरविण्याचे मान्य केले आहे. पालिकेने या कामासाठी सहा लाख रुपये यांत्रिकी शाखेकडे वर्ग केले आहेत. नगरपालिकाही काही आवश्‍यक साहित्य देणार आहे. दहा दिवसांत गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगरपालिका सूत्रांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या तोंडावर महादरे तळे कोरडे पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. तळ्यातील गाळ काढल्याने महिनाभर पुरेल इतके पाणी वाढू शकते. मेअखेर गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत.
- वसंत लेवे, नगरसेवक

Web Title: mahadare lake mud