शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर करताय काय?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

एक नजर

  • पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची जत तालुक्‍यातील दुष्काळी भागाला भेट. 
  • दुष्काळ पीडित शेतकऱ्यांनी पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा छावणी, शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न, यामुळे आलेले दारिद्र्य, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन ठोस पावले कधी उचलणार, अशी शेतकऱ्यांकडून विचारणा. 

जत - पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी तालुक्‍यातील दुष्काळी भागाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळ पीडित शेतकऱ्यांनी पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा छावणी, शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न, यामुळे आलेले दारिद्र्य, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन ठोस पावले कधी उचलणार, अशी विचारणा केली. 

श्री. जानकर म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सक्त आदेश देण्यात आले आहेत. जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जत तालुक्‍यातून चार प्रस्ताव आले आहेत. दोन प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. बऱ्याच जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. लवकरच येणाऱ्या सर्व प्रस्तावांनाही मंजूरी दिली जाईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी मी स्वतः उभे राहू.’’

श्री. जानकर यांनी जत तालुक्‍यातील माडग्याळ, वायफळ, अंकलगी, कुलाळवाडीसह गावांत पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार विलासराव जगताप, सांगली बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम, ॲड. प्रभाकर जाधव, उमेश सावंत, अजितकुमार पाटील, माडग्याळचे सरपंच आप्पु जत्ती, महादेव माळी, पं. स. सदस्य विष्णु चव्हाण, नंदकुमार बुकटे, शंकर बागेळी उपस्थित होते.

श्री. जानकर यांना दुष्काळी भागातील पीडित शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. सातत्याच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांत ताकद राहिलेली नाही. टॅंकरद्वारे पाणी अपुऱ्या स्वरूपात व दुषित पुरवले जाते. तालुक्‍यात चारा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना जनावरांचा संभाळ करणे जिकरीचे झाले आहे. शासन सुविधा देण्यात चालढकल करीत आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केल्या.

Web Title: Mahadev Jankar visit to water scarcity Jat Taluka