महादेवराव महाडिक यांनी घेतल्या चंदगडमधील नेत्यांच्या भेटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

चंदगड - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज येथील विविध पक्ष, गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या.

चंदगड - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज येथील विविध पक्ष, गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. ज्येष्ठ नेते व्ही. एस. वाली, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, माजी सरपंच अरुण पिळणकर, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, फिरोज मुल्ला, तजमुल फणीबंद यांच्या घरी जाऊन चर्चा केली. ही भेट केवळ अनौपचारिक असल्याचे सांगून त्यांनी राजकीय चर्चा टाळली खरी; परंतु उपयोगी पडणाऱ्या माणसाला आपण आयुष्यभर विसरत नाही, हे सांगायला ते विसरले नाहीत. 

सकाळी साडेआठ वाजताच महाडिकांची स्वारी माजी सरपंच अरुण पिळणकर यांच्या घरी अवतरली. एवढ्या सकाळी ते येतील याचा अंदाज नसलेल्या पिळणकर यांची त्यामुळे चांगलीच धावपळ उडाली. महाडिक यांच्याबरोबर माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील, प्रा. एन. एस. पाटील, डॉ. गफार मकानदार आदी कार्यकर्ते होते.

पिळणकर यांच्या घरी फराळ घेतला. पिळणकर यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर फोटो सेशनही केले. त्यानंतर दयानंद काणेकर, बाबूराव हळदणकर, फिरोज मुल्ला, तजमुल फणीबंद, व्ही. एस. वाली यांच्या घरीही भेट दिली. हळदणकर यांच्या घरी अशोक पाटील यांनी त्यांचे स्वागत करून राजकीय चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाडिक यांनी आपण केवळ अनौपचारिकरीत्या भेटीसाठी आलो असल्याचे सांगत राजकीय चर्चा टाळली. त्याचवेळी उपयोगी पडणाऱ्या माणसांना महाडिक आयुष्यभर विसरत नाहीत, या वाक्‍यावर जोर दिला. दुपारी बाराच्या सुमारास स्थानिक सर्व नेत्यांचा निरोप घेऊन ते पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. दरम्यान, त्यांच्या भेटीमुळे स्थानिक नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadevrao Mahadik meets leaders in Chandgad Taluka