कितीही वाईट चिंता, आमची मैत्री कायम - महादेवराव महाडिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

कोल्हापूर - विरोधकांनी कितीही वाईट चिंतिले तरी पी एन. आणि आपण विभक्त होणार नाही. हे नाते न तुटणारे आहे. पी. एन. यांची आमदारकी मागे राहिली याचे दुःख वाटते. व्यवस्थितपपणे काम केले की ही कसरही भरून निघेल,' असा विश्‍वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज व्यक्त केला. महाडिक आणि आपण आयुष्यभर एकत्र राहण्याची ग्वाही पी. एन. पाटील यांनी या वेळी दिली.

कोल्हापूर - विरोधकांनी कितीही वाईट चिंतिले तरी पी एन. आणि आपण विभक्त होणार नाही. हे नाते न तुटणारे आहे. पी. एन. यांची आमदारकी मागे राहिली याचे दुःख वाटते. व्यवस्थितपपणे काम केले की ही कसरही भरून निघेल,' असा विश्‍वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज व्यक्त केला. महाडिक आणि आपण आयुष्यभर एकत्र राहण्याची ग्वाही पी. एन. पाटील यांनी या वेळी दिली.

पाटील यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर एकहाती सत्ता आणल्याबद्दल जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वतीने पाटील यांचा आज सत्कार झाला. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

महाडिक आणि दोघांचाही एकच हार घालून सत्कार झाला. त्याचा संदर्भ देत महाडिक म्हणाले, ""एकच हार घालून फोटो काढाल, पण पूर्वीपासून आम्ही एकच आहोत. यापुढेही आमच्यात विभक्तपणा येणार नाही. संघाचे नेतृत्व दोघे करत आहोत. भविष्यातही हेच नेतृत्व कायम राहिल. विरोधकांनी कितीही वाईट चिंतिले तरी काळजी करू नका.

"भोगावती' कारखान्याच्या यशात "गोकुळ'चाही वाटा आहे. गेल्या वेळी चूक झाली अन्यथा कारखान्याची अशी स्थिती झाली नसती. "गोकुळ' ही फार मोठी शक्ती आहे. इंद्राला कवचकुंडले देताना कर्णाने विद्रुप होणार नाही आणि तथास्तु म्हणून शक्ती दिली. ती अडचणीच्या वेळी एकदाच वापरण्याची मुभा दिली गेली. "गोकुळ'ची शक्तीही अशीच आहे.

दूध संघ साडेसात लाख दूध उत्पादकांचा आहे. ज्याची गुंठाभर जमीन नाही, असाही सभासद संघाचा मालक आहे. अन्य संघ आले किती आणि गेले किती पण गोकुळवर परिणाम झाला नाही.

भोगावती कारखाना आर्थिक अडचणीत आहे. 85 ते 90 कोटींचा कारखान्यावर कर्जाचा बोजा आहे. पी. एन. यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. मी स्वतः त्यांच्यासोबत असेन. बाबासाहेब पाटील-भुयेकर आणि पी. एन. यांच्यामुळे मी राजाराम कारखान्यात आलो. गेली 25 वर्षे कारखाना माझ्याकडे आहे. पी. एन. ज्या वेळी केडीसीसीचे चेअरमन होते, त्या वेळी रामराज्य होते. कर्जासाठी त्यांनी अडवणूक केली नाही. किरकोळ चूक झाली आणि विदूषक आले. त्याची फळे ते भोगत आहेत. पी. एन. यांची आमदारकी पाठीमागे राहिली, याची खंत आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे काम केले तर ती ही अडचण राहणार नाही.
सत्काराला उत्तर देताना पी. एन. म्हणाले, ""सर्वपक्षीय पॅनेल विरोधात असताना भोगावतीची सत्ता खेचून आणली. महाडिक यांची मदत झाली. सात टक्के व्याजाने कर्ज देणारा मी देशातील पहिल्या जिल्हा बॅंकेचा चेअरमन होतो. "भोगावती'ला शहा यांच्यासारखा चांगले एम. डी. मिळाले तर शिस्त लागेल. आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक पद हवे अशी कारण नसताना चर्चा होते. संचालकांनी काही राजवाडे बांधलेले नाहीत. किरकोळ कारणामुळे आमच्या हातून बॅंक गेली. महाडिक आणि आपण आयुष्यभर एकत्रितच राहणार आहोत.''

विश्‍वास पाटील म्हणाले, 'महादेव आणि पांडुरंग हे दैवतच आहेत. दोघेही दूध संघाचे नेते आहेत. शेतकऱ्यांची भरभराट हाच गोकुळचा वसा आणि वारसा आहे.''

संचालक अरुण डोंगळे यांनी पी. एन. आणि महाडिक यांची अन्यत्र भूमिका वेगळी असेल, पण "गोकुळ'मध्ये तेच एकच असल्याचे सांगितले.

या वेळी रणजित पाटील, रवींद्र आपटे, विश्‍वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पांडुरंग धुंदरे, उदय पाटील, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, रामराजे कुपेकर, जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आदी उपस्थित होते.

अरुण नरके अनुपस्थित
संघाचे ज्येष्ठ संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे चेअरमन अरुण नरके या सत्कार सोहळ्यास अनुपस्थित राहिले. त्यामागील कारण समजू शकले नाही. नरके यांचे पुतणे आमदार चंद्रदीप नरके हे "भोगावती' च्या निवडणुकीत पी. एन. यांच्या विरोधात होते. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीवेळीही नरके यांनी पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यास विरोध केला होता.

कागलला गेला नाही.
इचलकरंजी शाखा फायद्यात कशी आणली, याचा संदर्भ पी. एन. पाटील देत असताना महाडिक यांनी मध्येच पी. एन. यांच्याकडे पाहत आपण "कागल'ला गेला नाही, याकडे लक्ष वेधले. कागलला गेला असता तर बरे झाले असते, असा महाडिकांचा रोख होता. अर्थात तो कुणाच्या दिशेने होते, हेही लपून राहिले नाही.

Web Title: mahadevrao mahadik talking