१४ मांजरे अन् कुत्र्याच्या साथीने एक अवलिया महापुरातही निवांत

१४ मांजरे अन्  कुत्र्याच्या साथीने एक अवलिया महापुरातही निवांत

कोल्हापूर - पंचगंगा नदीला आलेला महापूर आणि नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेले पुराचे पाणी. काठावरची सर्व मंदिरे पाण्याखाली, फक्त उंच शिखरे आणि शिखराला लगत बांधलेली पत्र्याची एक खोली काय ती पाण्याबाहेर. या खोलीच्या खिडकीतून कंदिलाचा प्रकाश लुकलुकत असतो. एवढ्या मोठ्या पुराने वेढलेल्या त्या खोलीत कोण बरे राहत असेल... एवढाच विचार पंचगंगा नदीच्या पुलावरून महापूर पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतो.

महापुराने वेढलेला एक मजला पाण्याखाली, वरचा मजला पाण्यावर असलेल्या या खोलीत महेश भालेकर हा तरुण एकटाच राहत असतो. त्याच्याबरोबर असलेल्या एक नव्हे, दोन नव्हे, १४ मांजरांचा व एका कुत्र्याचा त्याला आधार असतो.  पुराचे पाणी वाढत असताना नदीकाठचा सर्व परिसर चिंतेत असतो; पण महेश भर पुरात मांजरे, कुत्र्याच्या साथीने छोट्या खोलीत बिनधास्त राहतो. 

पंचगंगा काठावर एका बाजूला जुन्या मंदिरांचा समूह आहे. त्याला समाधीचा परिसर असेही म्हणतात. तेथे राजघराण्यातील व्यक्तींवर अंत्यसंस्कार होतात. स्मशानाचा लवलेशही जाणवणार नाही इतका सुंदर हा परिसर आहे. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर आले, की या मंदिरांच्या बाजूला पसरू लागते. मंदिरांच्या आवारात जाते व पाण्याची पातळी वाढू लागली, की एक एक मंदिर पाण्याखाली जाते. याच मंदिरांच्या आवारात उंचावर एक जुनी खोली आहे. तेथे तालीम होती, असे म्हणतात. तेथे गेली वीस-पंचवीस वर्षे महेश भालेकर राहतो. 

मंदिर परिसरावर नजर ठेवतो. त्याचे वैशिष्ट्य असे की, तो आपल्या सोबत नेहमी पंधरा ते वीस मांजरांचा ताफाच ठेवतो. एका अवलियासारखाच महेश येथे जगतो. इतर वेळी या मंदिरांच्या परिसरात राहणे ठीक आहे; पण पावसाळ्यात पंचगंगेच्या पुराचा विळखा पहिल्यांदा या मंदिरांना पडतो व मंदिरांचा परिसर पाण्याखाली जातो. पण महेश हा परिसर सोडत नाही. एक कंदील, बॅटरी सोबत घेऊन 

मंदिराच्या शिखरालालगतच्या खोलीतच राहतो. तो मूळ नदीकाठच्या शुक्रवार पेठ परिसरातलाच. त्यामुळे त्याला पुराची भीती वाटत नाही. तो कितीही मोठा पूर येऊ दे, सभोवती पुराचे पाणी असलेल्या खोलीतच राहतो. त्याला त्याच्या घरातले लोक जेवण पाठवतात. रबरी इनरवर बसून त्याचे मित्र पाण्यातून महेश जवळ येतात. 

जेवण देतात काही वेळ गप्पा मारतात व निघून जातात. जेवण केवळ महेशलाच नव्हे तर त्याच्यासोबत असलेल्या चौदा माजरांना व एका कुत्र्यासाठी ही ते खाद्य आणतात. दिवसातून एकदा त्याचा मोबाईलही चार्जिंग करून आणून देतात. 
दिवस मावळला की केवळ पाऊस, वारा आणि पुराच्या पाण्याचा खळाळणारा आवाज. ठळक जाणवू लागतो. मग महेश खोलीतला कंदील पेटवतो. खोलीतच मांजरांसोबत जेवण घेतो. पुराच्या पाण्यात सभोवती साप व मोठ्ठे बेडूक असतात. त्यातले साप बेडूक आसऱ्यासाठी महेशच्या खोलीकडे येतात; पण १४ मांजरे त्या सापावर तुटून पडतात. रात्र झाली, की मोबाईलची गाणी ऐकत महेश झोपी जातो. आजूबाजूला पुराचा विळखा असतो, पण हा अवलिया असा की अशा वातावरणात ही शांतपणे झोप काढतो. 

मला महापुराची भीती वाटत नाही. कारण पंचगंगेच्या काठावरच मी लहानाचा मोठा झालो आहे. काठावरची मंदिरे, त्यावरचे शिल्पसौंदर्य मला तेथे खेचून नेतात. मी मंदिराच्या शिखराला जवळ असलेल्या खोलीत राहतो. माझ्यासोबतची चौदा मांजरे मला साथ देतात. २००५ ला मात्र मी राहत असलेल्या खोलीतही कमरेइतके पाणी आले. मग मी खोलीच्या पत्र्यावर जाऊन बसलो. मांजरासोबत पोहत काठावर आलो. 
- महेश भालेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com