'महाजनादेश यात्रा' 29 ऑगस्टला धडकणार कोल्हापुरात

Mahajanadesh Yatra
Mahajanadesh Yatra

कोल्हापूर : युती सरकारने गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात आश्वासक काम केले आहे. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण देऊन सरकारने वचनपूर्ती केली. या सर्व उपलब्धीची माहिती देण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा 29 ऑगस्टला कोल्हापुरात येईल. यावेळी कोल्हापूर शहरात रोड शो करण्यात येणार आहे, अशी माहिती पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

भेगडे म्हणाले, महाजनादेश यात्रा ही संकल्पना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली. याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील 32 जिल्हे आणि सुमारे 275 विधानसभा मतदार संघ यांना भेटी देणार आहेत. या ठिकाणी जाऊन ते सरकारची पाच वर्षातील उपलब्ध लोकांपर्यंत पोहचवतील. 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये महाजनादेश यात्रा होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात यात्रा पश्चिम महाराष्ट्रात येईल. सांगली मार्गे 29 ऑगस्टला इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रा पोहोचेल. तेथून रात्री साडेआठच्या सुमारास तावडे हॉटेल येथे महाजनादेश यात्रा येईल. तेथे कार्यकर्ते भव्य स्वागत करतील. तेथून ही यात्रा ताराराणी चौकात येईल. तेथे रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी यात्रा राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करेल.

दरम्यान, यात्रेच्या तयारीसाठी बिंदू चौक येथे आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये भेगडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अधिकाधिक संख्येने यात्रेचे स्वागत करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, आर.डी. पाटील, हेमंत आराध्ये, शिवाजी बुवा आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com