कवठेमहांकाळमध्ये महांकाली नदीचा शोध

- बलराज पवार
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सांगली - "जलबिरादरी'च्या माध्यमातून जलसाक्षरता मोहिम राबवणारे "जोहडबाबा' ऊर्फ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या अभ्यासू निरीक्षणामुळे कवठेमहांकाळ तालुक्‍यात अग्रणी नदीची उपनदी असल्याचे निदर्शनास आले आहे.

सांगली - "जलबिरादरी'च्या माध्यमातून जलसाक्षरता मोहिम राबवणारे "जोहडबाबा' ऊर्फ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या अभ्यासू निरीक्षणामुळे कवठेमहांकाळ तालुक्‍यात अग्रणी नदीची उपनदी असल्याचे निदर्शनास आले आहे.

कवठेमहांकाळ तालुक्‍यात कोकळे येथे प्रचंड मोठा ओढा आहे. त्याच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. जलबिरादरी, सरकार आणि लोकसहभागातून हे काम होत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा सहकाऱ्यांसह तेथे गेले होते. त्या वेळी त्यांना काही गोष्टींचे निरीक्षण केल्यानंतर हा ओढा नसून, ती नदीच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्या वेळी पूर्वी तेथे नदी होती; मात्र जसे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत गेले आणि पर्जन्यमान घटले तसे केवळ पावसाळ्यातच थोडेफार पाणी वाहताना दिसू लागले. त्यामुळे नदीचा ओढा झाला आणि त्याचे नाव "कोकळ्याचा ओढा' असे झाले. या ओढ्यावर एक मोठा दगडी पूलही बांधण्यात आला आहे.

नदीच्या खुणा
डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना पाहणी करताना या ओढ्याची रुंदी सुमारे दीडशे ते दोनशे फूट असल्याचे लक्षात आले. तसेच त्यावरील पूलही सुमारे 300 फूट रुंदीचा असल्याचे दिसून आले. साधारणपणे ओढ्याचे पात्र इतके रुंद नसते किंवा त्यावरील पूलही एवढा मोठा नसतो. शिवाय ओढ्याच्या शेजारीच यल्लम्मा देवीचे मंदिर आहे; मात्र असे मंदिर नदीजवळच किंवा तिच्या काठावर असण्याची शक्‍यता जास्त असते. या सर्व खुणा नदीच्या असल्याचे लक्षात आले. त्यावरून पूर्वी तेथे नदी असावी, असा अंदाज आला.

ेपुनरुज्जीवनाचे काम सुरू
डॉ. राणा यांनी ग्रामस्थांशी कोकळे ओढ्याबाबत आणखी चर्चा केली असता, त्यांना पूर्वी येथे नदी असल्याचा दुजोरा मिळाला. ही अग्रणी नदीची उपनदी होती. तिचे महांकाली नदी असे नामकरणही केले. आता तिचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. करलहट्टीपर्यंत या नदीची लांबी 22.5 किलोमीटर आहे. दुष्काळी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या सीमेवरील एकूण 20 गावे या नदीच्या पाणलोट क्षेत्रात येतात. यात कवठेमहांकाळमधील 11 आणि जतमधील नऊ गावे आहेत. सध्या नदी पात्राच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सरकारच्या वतीने सुरू असलेले हे काम 40 लाख रुपयांचे आहे. या कामावर गावातील पाच ग्रामस्थांची समिती डॉ. राणा यांनी नेमली असून, ती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे.

कोकळ्याचा ओढा ही अग्रणीची उपनदी म्हणून सापडली आहे. लोकसहभागातून ही नदी बारमाही प्रवाही करण्यावर आमचा भर आहे. यामुळे दुष्काळी तालुक्‍यांना ही नदी वरदान ठरणार आहे.
- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी,

Web Title: mahakali river search in kavthemahankal