आदिनाथ तीर्थंकरांवर महामस्तकाभिषेक (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

एक नजर

  • भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा
  • शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळा. 
  • स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली चैतन्यदायी वातावरणात सोहळा. 
  • कल्लाप्पाण्णा आवाडे आणि इंदुमती आवाडे यांना ‘आदर्श दांपत्य’, तर प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’. 

 

कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली चैतन्यदायी वातावरणात हा सोहळा झाला. कल्लाप्पाण्णा आवाडे आणि इंदुमती आवाडे यांना ‘आदर्श दांपत्य’, तर प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन मठात दरवर्षी आदिनाथ तीर्थंकरांचा महामस्तकाभिषेक सोहळा होतो. सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष त्यानंतर ध्वजारोहण व चंद्रप्रभ तीर्थंकरांच्या पंचामृत अभिषेक झाला. यानंतर नऊच्या सुमारास मौजीबंधन झाले, तर सकाळी ११ वाजता ज्वालामालिनी देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली. दुपारी तीन वाजता देवी श्री ज्वालामालिनी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

यानंतर सायंकाळी लक्ष्मीसेन महास्वामी, जिनकंची (तमिळनाडू) येथील लक्ष्मीसेन स्वामी व ईलय भट्टारक महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे व इंदुमती आवाडे यांना ‘आदर्श दांपत्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिगंबर जैन बोर्डिंगचे सुरेश रोटे यांनी मानपत्राचे वाचन केले. यानंतर प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सम्मेद उपाध्ये यांनी त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले. पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. 

या पुरस्कार समारंभाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, महापौर सरिता मोरे, कोलकत्ता येथील पारस कुमार पांड्या व गुणमाला पांड्या प्रमुख उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी बृहनमूर्तीवर महामस्तकाभिषेकास प्रारंभ झाला. प्रारंभी पंचामृत अभिषेक झाला व त्यानंतर दूध, दही, इक्षु रसाभिषेक, आमरस अभिषेक, कल्क चूर्ण, कुंकुमाभिषेक, कशायद्रव्य, हळदा अभिषेक, सवैषधी, चतुष्कोण, अष्टगंध आधी अभिषेक पार पडले. 

प्रामाणिकपणा व विश्‍वासार्हता हीच आवडे परिवाराची ओळख, तर सत्काराला उत्तर देताना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी प्रामाणिकपणा विश्‍वासार्हता हीच आवडे परिवाराची ओळख असल्याचे सांगितले. आधुनिक शेतीची कास धरत समाजकारणात, राजकारणात सहभाग घेतला. या प्रवासात पत्नीनेही खंबीरपणे साथ दिली. आपली पुढची पिढीही तो वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचा अभिमान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahamastkabhishekh on Adinath Tirthankar in Kolhapur