महाराज मुख्याधिकाऱ्यांबाबत तुम्हीच निर्णय घ्या !

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 19 जुलै 2019

रजेचे गौडबंगाल काय? 
नगरअभियंता भाऊसाहेब पाटील मार्चपासून रजेवर असल्याने साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांच्या ई-निविदा प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक परवानगीपोटी पालिकेस प्राधिकरास सुमारे दहा लाख रुपये भरावे लागण्याची शक्‍यता आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी बैठकीत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे पाटील रजेवर जाण्याचे नेमके गौडबंगाल काय? अशी चर्चा सदस्यांमध्ये होती. 

सातारा  ः मुख्याधिकारी शंकर गोरे हे आमच्याबरोबर साताऱ्याच्या जनतेला फसवत आहेत. त्यांच्याबाबत आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, अशी विनवणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली. 
खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, आघाडीतील सदस्यांसह मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या शनिवारी (ता. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. 
या वेळी काही सदस्यांनी पूर्वीचे आमचे विषय मंजूर होऊन सुद्धा अद्याप ते मार्गी लागले नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न मुख्याधिकाऱ्यांना केला. मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे दिली; परंतु त्याने सदस्यांचे काही समाधान झाले नाही. वर्षानुवर्षाचे विषय मंजूर होऊनसुद्धा ते मार्गी लागत नाहीत म्हणजे काय? असा सूर महिला सदस्यांनी आवळला. त्यानंतर बहुतांश सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उदयनराजेंकडे नाराजी व्यक्त करीत हे केवळ आपलीच नव्हे तर साताऱ्याच्या जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, अशी विनवणीही केली. दरम्यान बैठकीनंतर खासदार भोसले, मुख्याधिकारी गोरे यांच्यात कमराबंद चर्चा झाली. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharaj you decide on the chief officer