महाराजांच्या सुवर्ण मूर्तीचा संकल्प - भिडे गुरुजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

बिजवडी - छत्रपती शिवाजी महाराजांची ३२ मण सोन्याच्या मूर्तीची रायगडावर प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तीन जून रोजी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर मूर्ती प्रतिष्ठापनेची भीष्म प्रतिज्ञा करण्यात येणार असून, माण तालुक्‍यातून दहा हजार शिवप्रेमी युवकांनी रायगडावर उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी भिडे (गुरुजी) यांनी केले. 

येथे श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त भिडे गुरुजींचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दासबोध, रामायण, महाभारत जे वाचणार नाहीत, तुकोबा, माउलींच्या चरणी जे जाणार नाहीत, त्यांना शिवाजी महाराज कधीच कळू शकणार नाहीत. यासाठी महाभारत, रामायण, दासबोध वाचण्याची गरज आहे. सूर्याचा प्रकाश जेवढा झाडाला पोषक आहे, तसाच प्रकाश शिवाजी महाराजांचा असून, शिवसूर्याच्या प्रकाशात जो वाढला त्याच्यात धर्माभिमान, देशाभिमान प्रखर राहतो. शिवाजीराजे व संभाजीराजे या पिता-पुत्रांचे ज्याने चिंतन केले, त्याचे आयुष्य निश्‍चितच चांगले जाणार असून, ज्ञानोबा-तुकोबांच्या आचार-विचारांची जपणूक करून आपले जीवन सार्थकी लावण्याची गरज आहे.’’ हिंदूधर्म जर जपायचा असेल तर या पिता-पुत्राला आपल्या हृदयात ठेवणे गरजेचे आहे. इस्लाम कुरघोड्या करून हिंदू धर्माचा विनाश करू पाहतोय. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी मला युवकांची गरज आहे. एक तरुण पोर म्हणजे एक बंदा रुपाया असून, मला मानधन देण्यापेक्षा तेवढी मुले शिवप्रचारासाठी द्या, त्यांच्या डोक्‍यात हिंदू धर्माचे रक्षण, हिंदवी स्वराज्य, शिवसंभाजींचा महिमा, राष्ट्रोध्दार आदी विषयांचा बीजमंत्र घालण्याचा प्रयत्न करतो, असेही भिडे गुरुजी म्हणाले.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने शिवसेनेचे माण तालुकाप्रमुख संजय भोसले व अक्षयमहाराज भोसले यांच्या हस्ते भिडे गुरुजींना माणदेशी घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Maharaj's golden idol Resolution