महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

  • महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर .
  • कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम देसाई आणि सोलापूरमधून मिलिंद थोबडे यांची निवड.
  • 28 मार्च 2018 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्यावतीनेही ही निवडणूक. 

कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम देसाई आणि सोलापूरमधून मिलिंद थोबडे यांची निवड झाली. ही निवडणूक 28 मार्च 2018 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनेही घेण्यात आली. 

निवडणूक प्रक्रियेत झालेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी निवडणूक प्राधिकरण नेमले होते. या मध्ये झारखंडचे माजी मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य दोन न्यायमूर्ती अशा तिघांचा समावेश होता. त्यांनी दिल्लीत आज हा निकाल जाहीर केला. विशेष म्हणजे प्रथम क्रमांकाची मते मिळवलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना विकारी प्रचार केल्याच्या आरोपातून अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे पंचवीसनंतर पुढील 26 क्रमांकाच्या वकिलांना कौन्सिलमध्ये स्थान मिळाले आहे. 

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक मार्चमध्ये झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात चुरस झाली होती. मतदान प्रक्रिया आणि प्रचारात मोठ्या प्रमाणात आमिषे दाखविण्यासह इतर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमण्यात आले. प्राधिकरणाकडे झालेल्या सुनावणीत सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या. वकिलांच्या समस्या, त्यांना मिळणारे वेल्फेअर, सोयी-सुविधा आदी विषय प्रचाराच्या दरम्यान चर्चेत होते. निवडणूक निकालानंतर आजही कौन्सिलबाबत प्राधिकरणाच्या निकालाची उत्सुकता कायम होती. 

27 जणांचे मंडळ 
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलसाठी 25 संचालक असतात. ते सर्व निवडणुकीतून विजयी होतात. तसेच महाराष्ट्रातील आणि गोव्यातील ऍटलरी जनरल असे दोघे या कौन्सिलवर पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे एकूण 27 जणांचे संचालक मंडळ असते. ही निवड पाच वर्षांसाठी असते. पहिल्या बैठकीनंतर पाच वर्षे मोजण्यात येतात. विजयी झालेल्या 25 जणांमध्ये साधारण पुढील आठवडा-पंधरा दिवसांत निवडणूक होऊन अध्यक्ष निवड होते. 

बार कौन्सिलचे अधिकार 
एखाद्या वकिलावर तक्रार झाली, तर त्याची सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्ययी समिती तयार केली जाते. तक्रार आलेल्या जिल्ह्यातील कौन्सिलचा संचालक अध्यक्ष असतो. अध्यक्ष अन्य कोणताही एक सदस्य समितीसाठी निवडतो. तसेच शेजारील जिल्ह्यातील एका वकिलांची निवड केली जाते. अशा त्रिसदस्यीय समितीकडून न्याय दिला जातो. त्यामुळे या पदाला अधिक महत्त्व आहे. ही समिती किमान सहा वर्षे वकिलाची सनद रद्द करू शकते. 

घाटगे 25 पैकी 11 व्या स्थानी 
28 मार्च 2018 मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात 4500 पैकी 2499 मतदान झाले. 1152 मतदान कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे माजी निमंत्रक विवेक घाटगे यांना झाले. 25 पैकी अकराव्या क्रमांकावर त्यांना संधी मिळाली आहे. 

17 पैकी चार विजयी 
कोल्हापूर जिल्ह्यातून नऊ, सांगली जिल्ह्यातून तीन, सातारा जिल्ह्यातून तीन, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फक्त एक आणि सोलापूर जिल्ह्यातून एक अशा खंडपीठ कृती समितीच्या मागणीत पुढे असलेल्या जिल्ह्यातून 17 उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी चौघांना संधी मिळाली असून सोलापूरचे मिलिंद थोबडे यांना पुन्हा संधी मिळाली. 

अध्यक्षपदाचे दावेदार कोल्हापुरातून 
विवेक घाटगे सध्या अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. यापूर्वी शिवाजीराव चव्हाण आणि बाळासाहेब शेळके यांना कोणतेही पद नव्हते. तसेच महादेवराव आडगुळे 1998 ला अध्यक्ष होते. त्यानंतर कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रला संधी नव्हती. त्यामुळे  घाटगे हेच आता अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्षपदासाठी घाटगे निवडणूक लढवणार आहेत. 

विजयी उमेदवार असे 

अनुक्रमे प्राधान्य ः आशिष देशमुख, गजानन चव्हाण, विठ्ठल देशमुख, परिजात पांडे, राजेंद्र उमाप, जयवंत जयभाये, हर्षद निंबाळकर, अविनाश आव्हाड, संग्राम देसाई, वसंत साळुंखे, विवेकानंद घाटगे, मोतिसिंग मोहता, आण्णाराव पाटील, आसिफ कुरेशी, उदय वारुंजीकर, मिलिंद पाटील, मिलिंद थोबडे, अनिल गोवरदिपे, सतीश देशमुख, अमोल सावंत, अविनाश भिडे, सुभाष घाटगे, सुदीप पशबोला, वसंत भोसले आणि अहमदखान पठाण. 

सर्किट बेंचसाठी आग्रही राहणार 
कौन्सिलच्या सदस्यपदी माझ्यासह सिंधुदुर्गचे संग्राम देसाई, साताऱ्याचे वसंतराव भोसले असे तिघे आहोत. तिघांची ताकद सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यासाठी प्रयत्न केले जाईल. सर्किट बेंच मिळेपर्यंत आम्ही पूर्ण स्वस्थ बसणार नाही. नवीन वकिलांना जादा काम कसे मिळेल, न्यायाधीशांच्या नियुक्ती परीक्षेची रचना बदलण्यासाठी प्रयत्न करू, पक्षकारांना जास्तीत जास्त सेवासुविधा मिळाव्यात, ज्येष्ठ वकिलांना कायमस्वरूपी निवृत्तिवेतन किंवा निधी (फंड) देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया विवेक घाटगे यांनी दैनिक "सकाळ'शी बोलताना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Goa Bar council result declared